"मॉडेल वारकरी तळ ते 36 वॉटरप्रुफ मंडप"
यंदाच्या आषाढी वारीत नवे बदल?
मुंबई : खरा पंचनामा
पंढरपुरची 'आषाढी वारी' पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. वारकरी आणि वारी राज्याचे वैभव वाढविणारी आहे. यावर्षी पावसाचे आगमन लवकर झाले असून या पार्श्वभूमीवर सर्व मानाच्या पालख्यांना आणि वारकऱ्यांसाठी पाणी, आरोग्य सुविधा, फिरती शौचालये आणि पोलीस बंदोबस्तासाठी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे. वारी यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे आषाढी एकादशी वारीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. पुण्याच्या प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे वारीच्या तयारीची माहिती सादरीकरणातून दिली. त्यानंतर प्रमुख दिंडीचे प्रतिनिधी, विश्वस्त यांनी वारीसंबंधात सूचना, अडचणी मांडल्या.
पुणे शहराच्या ठिकाणी विविध स्वागत मंडप, लाऊड स्पीकरवर बंदी, प्रत्येक पालख्यांना जास्तीचा पोलीस बंदोबस्त, अरूंद रस्त्यांचे रूंदीकरण, वाखरी मॉडेल वारकरी तळ, पालखीसोबत साध्या अॅम्ब्युलन्ससोबत कार्डियाक अॅम्ब्युलन्स, दर्शन पासची संख्या, वॉटर प्रूफ टेंट, पाण्याचे टँकर, मुबलक औषध साठा, पालख्यांच्या पारंपरिक मार्गाचा विकास, फिरती शौचालये, याबाबत सूचना मांडण्यात आल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, वारीचे योग्य नियोजन करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आयुक्तांनी पालख्यांच्या स्वागतासाठी वेगळी व्यवस्था करावी. रस्त्याच्या बाजूला मंडप टाकून स्वागत करावे, मात्र पालख्यांना विलंब होवू नये, याची दक्षता घ्यावी. वारीच्या यशस्वी नियोजनासाठी आपत्ती व्यवस्थापनाने दक्ष राहावे.
राज्यातील विविध भागातून पालख्या पंढरपूरला येतात. नाशिक, विदर्भ, मराठवाडा या ठिकाणाहून येणाऱ्या पालख्यांना पालखी मार्गात सोयीसुविधा देण्यासाठी नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागीय आयुक्तांनी समन्वयांनी बैठक घेऊन उपाययोजना कराव्यात. आपापल्या जिल्ह्यातून पालख्या जाताना स्थानिक प्रशासनाने रस्ते, पाणी, वीज, पोलीस बंदोबस्त, आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी तत्काळ बैठका घेऊन नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
पोलीस महासंचालक यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी योग्य समन्वय साधून पालख्यांच्या बंदोबस्ताची, वाहतूक, अपघात होणार नाहीत, यासंदर्भात दक्षता घ्यावी. सर्व मानाच्या पालख्यांना सेवा सुव्यवस्थित राहील याची व्यवस्था करावी. जिल्ह्याची हद्द संपल्यावर पोलीस बंदोबस्तासाठी पुढील जिल्ह्यातील पोलिसांनी अगोदरच हजर राहून कोणतीही पालखी, दिंडी पोलिसांविना राहणार नाही, याची दक्षता घ्यावी.
सर्व संतांच्या मानाच्या पालख्या वाखरीजवळ एकत्र येतात. राज्यभरातून शेकडो पालखी सोहळे पंढरीची वाट चालत असताना पालख्यांच्या स्वागतासाठी संत नामदेव महाराजांची पालखी वाखरी येथे येते. याठिकाणी पालख्यांच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी होते. सोलापूर जिल्हा प्रशासनाने गर्दी नियंत्रणात राहण्यासाठी योग्य नियोजन करून दक्षता घ्यावी. नामदेव महाराज यांचा ओट्याचा पुनर्विकास करावा. गर्दी लक्षात घेऊन वाखरीचे विशिष्ट मॉडेल वारकरी तळ होण्यासाठी आराखडा तयार करणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.