'एन्काउंटर स्पेशालिस्ट' दया नायक यांना एसीपी पदावर बढती !
मुंबई : खरा पंचनामा
मुंबईतील गुन्हेगारी जगताला हादरवणाऱ्या कारवायांमुळे चर्चेत असलेले प्रसिद्ध पोलिस अधिकारी दया नायक यांना सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP) पदावर बढती मिळाली आहे.
ग्रामीण कर्नाटकापासून मुंबईपर्यंतचा प्रवास दया नायक हे मूळचे कर्नाटक राज्यातील करकला तालुक्यातील एन्नेहोल गावाचे रहिवासी. अत्यंत सामान्य पार्श्वभूमीतून आलेल्या नायक यांनी कठोर परिश्रम, प्रामाणिक वृत्ती आणि धाडसी निर्णयांच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
१९९५ साली त्यांनी मुंबई पोलिस दलात प्रवेश केला आणि अल्पावधीतच त्यांनी एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून स्वतःचं नाव कमावलं. १९९० च्या दशकात आणि २००० च्या सुरुवातीला जेव्हा मुंबई अंडरवर्ल्डच्या सावटाखाली होती, तेव्हा दया नायक यांनी गुन्हेगारी विश्वाला आव्हान देणारे अनेक धाडसी ऑपरेशन केले. २००४ पर्यंत त्यांनी ८५ पेक्षा जास्त एन्काउंटर करत मुंबईतील अनेक कुख्यात गुन्हेगाऱ्यांना कायमचा आळा घातला. त्यामुळे त्यांचं नाव गुन्हेगारांमध्ये भीतीचं आणि नागरिकांमध्ये विश्वासाचं प्रतीक बनलं.
अलीकडच्या काळात दया नायक यांनी मुंबईतील ड्रग्ज माफियांविरोधात प्रभावी मोहीम राबवली. उपनगरांमध्ये सक्रिय असलेल्या अंमली पदार्थांच्या रॅकेटवर त्यांनी धडक कारवाई करून अनेक नेटवर्क्स उद्ध्वस्त केली. त्यांनी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (ATS) मध्येही काम केलं असून, संघटित गुन्हेगारीच्या विरोधातील त्यांच्या कारवायांमुळे त्यांचं कौतुक केलं जातं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.