आरोपीला जन्मठेप तरीही मृत्यूचा दाखला मिळेना
अश्विनी बिद्रे खून प्रकरण
नवी मुंबई : खरा पंचनामा
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी आरोप सिद्ध झाल्यानंतर पनवेल जिल्हा न्यायालयाने मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या निकालामुळे अश्विनी यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला असला तरी त्यांचा संघर्ष मात्र अद्यापही थांबलेला नाही.
अश्विनी यांची हत्या झाल्याचे पनवेलचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांनी स्पष्ट केले असले तरी पोलीस मात्र मृत्यूच्या दाखल्यासाठी आवश्यक ती कारवाई करीत नाहीत. त्यामुळे अश्विनी यांचे पती आणि मुलगी पोलीस दलाकडून मिळणाऱ्या लाभांपासून वंचित राहिले आहेत.
ठाणे जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेचा तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरने ११ एप्रिल २०१६ रोजी अश्विनी बिद्रे यांची हत्या केली. कुरुंदकर हा पोलीस दलाचा लाडका अधिकारी असल्याने पोलिसांनी त्याला वाचवण्यासाठी जीवाचा मोठा अटापिटा केला. ठाणे पोलीस अधीक्षकांपासून ते नवी मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी कुरुंदकरची पाठराखण केली. त्यामुळे अश्विनी बिद्रे यांच्या नातेवाईकांना मोठा संघर्ष करावा लागला. पती राजू गोरे आणि भाऊ आनंद बिद्रे यांच्याकडून अहोरात्र होणाऱ्या पाठपुराव्यामुळे याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आणि कुरुंदकरसारखा नराधम गजाआड गेला.
राजू गोरे यांनी आपली पत्नी अश्विनी यांच्या मृत्यू दाखल्याची मागणी केली असता त्यांना मृतदेह सापडला नाही, शवविच्छेदन अहवाल आलेला नाही, असे कारणे देण्यात आली आहेत. मात्र आता न्यायालयाने अश्विनी यांची हत्या झालेचे स्पष्ट केले असले तरीही गोरे यांना त्यांच्या मृत्यूच्या दाखल्यासाठी कोणतेही सहकार्य पोलीस दलाकडून केले जात नाही. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अश्विनी बिद्रे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शिल्लक अर्जित रजेचा पगार, उपदान, बी.सी.पी.आय. फंडाची रक्कम आदी लाभवारसांना मिळण्यासाठी मृत्यूचा दाखला मिळणे आवश्यक आहे. मात्र आम्हाला न्याय मिळाला पण मृत्यूचा दाखला अद्याप मिळालेला नाही. दाखल्यासाठी पोलीस दलाकडून कोणतेही सहकार्य केले जात नाही, अशी खंत अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी व्यक्त केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.