राज्यातील फ्लॅटधारकांसाठी मोठी बातमी !
'व्हर्टिकल सातबारा'तून मिळणार जागेचे थेट स्वामित्व
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील फ्लॅटधारकांना त्यांच्या घराचे थेट स्वामित्व मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जाणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने 'व्हर्टिकल सातबारा' या क्रांतिकारी योजनेवर काम सुरू झाले असून, येत्या पावसाळी अधिवेशनात या संदर्भातील विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे.
सध्या गाळेदार तत्त्वावर असलेल्या इमारतींमध्ये राहताना रहिवाशांना सातबारा उतारा मिळत नाही. मात्र व्हर्टिकल सातबारा लागू झाल्यास, प्रत्येक फ्लॅटमालकाला त्याच्या फ्लॅटचा स्वतंत्र सातबारा उतारा मिळू शकणार आहे. त्यामुळे घराच्या खरेदी-विक्रीसह बँक कर्ज व्यवहार, वारसाहक्क हस्तांतरण या बाबी सोप्या आणि पारदर्शक होतील.
राज्यातील शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर बहुमजली इमारती उभ्या राहिल्या असताना, त्या जागेच्या मूळ सातबारावरच नोंद होत असल्याने फ्लॅटधारकांना त्यांचे थेट मालकी हक्क सिद्ध करणे अवघड जाते. हे लक्षात घेऊन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या योजनेचा प्रस्ताव तयार केला असून, अंतिम मसुद्यावर सध्या विचारविनिमय सुरू आहे.
'व्हर्टिकल सातबारा' हा महाराष्ट्रातील मालमत्ता हक्क व्यवस्थेतील ऐतिहासिक बदल ठरणार आहे. यामुळे घर खरेदी करणाऱ्यांना त्यांच्या जागेचा स्वतंत्र मालकी हक्क मिळेल आणि शासकीय कागदपत्रांतील गुंतागुंत कमी होईल, असे महसूल विभागातील सूत्रांनी सांगितले. येत्या पावसाळी अधिवेशनातच हे विधेयक मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे घरमालकांसाठी ही योजना दिलासा देणारी ठरणार असून, राज्यातील मालमत्ता व्यवस्थापनात नवा अध्याय सुरू होणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.