Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

५ जुलैला एकत्र विजयी मेळावा होईल, पण पक्षीय लेबल...

५ जुलैला एकत्र विजयी मेळावा होईल, पण पक्षीय लेबल...

मुंबई : खरा पंचनामा

हिंदी सक्तीबाबतचे दोन जीआर रद्द करण्यासाठी सरकारला भाग पाडल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आभार मानले. पण मोर्चा रद्द झाला असला तरी ५ जुलै रोजी विजयी मेळावा होईल. त्यासाठी ठिकाण एकत्र मिळवून ठरवू. पण याला पक्षीय लेबल लावले जाणार नाही, असे राज ठाकरे यांनी सोमवारी (दि. ३० जून) स्पष्ट केले.

सर्व बाजूने तो रेटा आला. गरज नसताना विषय आले. त्याबाबत मराठी जनांचे, साहित्यिक, मोजके कलावंत, मराठी पत्रकार आणि संपादकांचे आभार. हिंदीचा विषय श्रेयवादाचा नाही. सरकार पुन्हा या वाटेला जाणार नाही, अशी अपेक्षा आहे. मराठीच्या विषयात कोणतीही तडजोड होणार नाही. महाराष्ट्राचे लचके तोडण्याचे काम सुरु आहे. हे थांबयला पाहिजे, असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला.

पत्र लिहिली. वातावरण तापले. सर्व राजकीय पक्ष, उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनीदेखील पाठिंबा दिला. आधी ६ तारीख होती मग ५ तारीख केली. न भूतो असा मोर्चा निघाला असता. पण आता मोर्चा रद्द झाला असून विजयी मेळावा होईल. सरकार परत अशा भानगडीत पडणार नाही, अशी आशा बाळगतो, असेही राज ठाकरे म्हणाले.

मला संजय राऊत यांचा कॉल आला की विजयी मेळावा करावा. तो मेळावा जरी झाला तरी त्यात राजकीय लेबल लावायचे नाही. कारण तो मराठी माणसांचा मेळावा आहे. मराठी भाषा या विषयावर कोणाकडूनही तडजोड होता कामा नये. त्यासाठी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

दादा भुसे आल्यावर म्हणाले की ऐकून घ्या. ऐकून घेणार पण ऐकणार नाही. या विषयात तडजोड नाही. हे स्लो पॉयझन आहे. त्यांनी समिती आता नेमावी आणि हे परत होणार नाही हे त्यांनी लक्षात घ्यावे. आमच्या अभ्यासात ५ वी नंतर हिंदी आणि संस्कृत असले विषय होते. आम्ही शिकलो. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही तर प्रांतभाषा आहे. उत्तर भारतातील अनेक लोक जर महाराष्ट्रात नोकरीसाठी येत असतील तर तिथे त्यांनी मराठी शिकवायला हवे. १५० वर्षे जुनी भाषा ३ हजार वर्षे जुन्या भाषेला मारत असेल तर असे होणार नाही, असे त्यांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.