हायकोर्टाची ईओडब्ल्यूला चपराक, अटकच ठरवली बेकायदा!
आरोपीची सुटका करण्याचे आदेश
मुंबई : खरा पंचनामा
दिल्ली विमानतळावरून आरोपीला ताब्यात घेऊन अटक करणाऱ्या आर्थिक गुन्हे विभागाला (ईओडब्ल्यू) उच्च न्यायालयाने चांगलीच चपराक दिली आहे. ही अटक बेकायदा ठरवून या आरोपीची सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
हेमांग शाह या व्यावसायिकाने ही याचिका केली होती. ईओडब्ल्यूने केलेली अटक बेकायदा ठरवून सुटकेचे आदेश न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. न्या. गौरी गोडसे व न्या. सोमशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. या याचिकेची गंभीर दखल घेत न्यायालयाने शाह यांच्या सुटकेचे आदेश दिले.
अटक केल्यानंतर ईओडब्ल्यूने 24 तासांच्या आत महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर केले नाही, असा दावा शाह यांनी केला होता. तो न्यायालयाने ग्राह्य धरला. नियमानुसार अटक केल्यानंतर आरोपीला दंडाधिकारी न्यायालयात हजर करणे बंधनकारक आहे. शाह यांच्या अटकेनंतर याचे पालन झाले नाही. अटकेच्या 24 तासांनंतर त्यांना दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले, असा ठपका खंडपीठाने ठेवला.
वडील व भावासोबत पैशांच्या व्यवहारावरून शाह यांचा वाद आहे. भावाने शाहविरोधात मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्याचा गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर लगेच शाह यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली. 17 मे रोजी मस्कतला जाण्याच्या तयारीत असलेल्या शाह यांना दिल्ली विमानतळ प्रशासनाने ताब्यात घेतले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.