ठाकरे बंधूंचा हिंदीविरोधात एल्गार; पण मुंबई पोलिसांकडून मोर्चाला 'नो परमिशन'?
मुंबई : खरा पंचनामा
हिंदी सक्तीविरोधात काढल्या जाणाऱ्या मोर्चाबाबत मनसे नेते आणि पोलीस अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक पार पडली. बैठकीत मनसे नेत्यांनी त्यांच्या मोर्चाच्या नियोजनाची माहिती सादर करत पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज केलाय. मात्र, पोलीस अधिकाऱ्यांकडून या मोर्चाला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही.
हा मोर्चा मुंबई उच्च न्यायालयाच्या नियम व अटीच्या अधिन राहून काढावा, अशा सूचना पोलिसांनी दिलेल्या आहेत. त्यामुळे पोलिस काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
जर पोलिसांनी परवानगी देण्यास विलंब केला तर महाराष्ट्रात मोठे राजकारण तापण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे, कारण, पहिल्यांदाच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र या मोर्चात सहभागी होणार आहेत.
पुढे आलेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आझाद मैदान वगळता इतर ठिकाण किंवा रस्त्यांवर मोर्चा किंवा आंदोलन करण्यास मनाई करण्यात आलेली आहे.
त्यानुसार हिंदीसक्ती विरोधात निघणारा मोर्चाही न्यायालयाच्या अटी व नियमांच्या अधिन राहूनच करावा, अशा सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.
सोबतच अधिवेशनचा कालावधी असल्याने या मोर्चाच्या परवानगीबाबत आता वरिष्ठ पातळीवर चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर त्यावर निर्णय होऊ शकतो. जर पोलिसांनी या मोर्चाच्या परवानगीला विलंब केला तर मात्र त्यांना मराठी माणसांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, एवढं मात्र सत्य आहे.
राज्यात पहिली ते चौथीच्या वर्गांमध्ये हिंदी ही तिसरी भाषा म्हणून सक्तीने शिकवण्याचा शासन निर्णयाला कडाडून विरोध होताना दिसतोय. दरम्यान याच हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून मनसे आणि शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला. राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याला, त्रिभाषा सूत्राला ठाकरे बंधूंनी विरोध केला. तर येत्या 5 जुलै रोजी या निर्णयाच्या विरोधात संयुक्त मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या निमित्ताने दोन्ही ठाकरे बंधूंची एकत्र ताकद दिसणार आहे.
या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मनसेची मुंबई पोलिसांसोबत बैठक झाली असून या बैठकीत पोलिसांनी मनसेकडून प्राथमिक तयारी जाणून घेतली आहे. नेमका मोर्चा कशा पद्धतीने आणि कुठे जाऊ शकेल?, या संदर्भातली माहिती पोलिसांनी जाणून घेतलीय. संबंधित माहिती वरिष्ठापर्यंत सांगून याबाबत निर्णय कळवणार असल्याचे वरिष्ठ पोलिसांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.