एकतर्फी प्रेमाचा कळस..! रोबोटिक्स एक्सपर्ट युवतीने पाठवले बॉम्बस्फोटाचे २१ ईमेल
१२ राज्यांत सुरक्षा यंत्रणा हादरल्या
चेन्नई : खरा पंचनामा
एकतर्फी प्रेम अयशस्वी झाल्यानंतर शेवटी कुणी एवढं भयंकर पाऊल उचलेल, हे कुणालाही स्वप्नातसुद्धा वाटणार नाही. परंतु चेन्नईतील एका रोबोटिक्स एक्सपर्ट असणाऱ्या युवतीने आपल्या प्रेमभंगाचा सूड घेताना संपूर्ण देशातील सुरक्षा यंत्रणेलाच हादरवून टाकले आहे. रेने जोशिल्दा असं त्या तरुणीचं नाव आहे.
रेने जोशिल्दा, ही नामांकित कंपनीतील कर्मचारी. परंतु तिचं सहकाऱ्यावरील प्रेम फेब्रुवारी २०२५ मध्ये दिविज प्रभाकरने लग्न केल्यानंतर भंग झालं. आणि याच भावनिक धक्क्याचा बदला घेण्यासाठी रेनेने एक असा सायबर प्लॅन रचला, ज्याने देशातील १२ राज्यांतील पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा गोंधळात टाकल्या.
रेनेने बनावट ईमेल आयडी तयार करून दिविज प्रभाकरच्या नावाने बॉम्बस्फोटाच्या २१ पेक्षा अधिक धमक्या विविध राज्यांतील पोलिसांना पाठवल्या. यात दिल्ली, पंजाब, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू यांसारख्या राज्यांचा समावेश होता.
या ईमेलमुळे देशभरात खळबळ माजली. विशेषतः अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणाऱ्या IPL २०२५ अंतिम सामन्याच्या अगोदरच्या दिवशी मिळालेली धमकी, प्रशासनासाठी मोठं आव्हान ठरली. त्याचप्रमाणे, अहमदाबादमधील विमान दुर्घटनेनंतर ज्यात २७० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला, त्या घटनेलाही रेनेने दहशतवादी कृत्य म्हणून रंगवण्याचा प्रयत्न केला. बीजे मेडिकल कॉलेजवर पाठवलेल्या धमकीच्या ईमेलमुळे तिने दिविजवर संशयाची सुई वळवण्याचा डाव आखला होता.
तिने अत्यंत चातुर्याने डार्क वेब आणि व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क (VPN) चा वापर करून स्वतःची ओळख लपवली होती. पण पोलिसांच्या सायबर तज्ज्ञांच्या मदतीने आणि फॉरेन्सिक तपासाद्वारे अखेर हा गुन्हा उघडकीस आला. रेनेला अटक करण्यात आली असून तिच्या चौकशीतून हे उघड झालं की केवळ दिविजला फसवून जेलमध्ये पाठवण्यासाठी तिने संपूर्ण देशाच्या सुरक्षेशी खेळ मांडला.
मात्र तिच्या कृत्यातून सर्वसामान्यांमध्ये दहशत पसरली आणि सुरक्षा यंत्रणाही त्रस्त झाल्या. सध्या रेने पोलिस कोठडीत असून तपास सुरू आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.