इंजिनियरिंग आणि डिप्लोमाच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुदतवाढ
मंत्री चंद्रकांत पाटलांचा निर्णय
मुंबई : खरा पंचनामा
विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला इंजिनियरिंग किंवा डिप्लोमा अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे का? पण अजून तुमचं अॅडमिशन झालं नाही? मग काळजी नको, कारण इंजिनियरिंगच्या प्रवेशाची मुदत वाढवण्यात आलीय. याबाबतची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलीय.
जून शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी दहावी नंतरच्या महाविद्यालयीन प्रथम वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान / वास्तुकला या पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया दिनांक 20 मे 2025 पासून सुरू झालीय. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची 26 जूनपर्यंत मुदत होती. परंतु प्रवेश प्रक्रियेसाठी मिळणारा प्रतिसाद पाहून अभियांत्रिकी पदविका प्रवेश अर्ज नोंदणीची पुन्हा मुदतवाढ 30 जुन 2025 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे, अशी माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलीय.
पुढील संपूर्ण प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक तंत्र शिक्षण संचालनालयाद्वारे जाहीर करण्यात आले आहे. 26 जून 2025 रोजी संध्याकाळ पर्यंत तब्बल 1 लाख 50 हजार 684 विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नोंदणी केली आहे, तर त्यापैकी 1 लाख 30 हजार 885 विद्यार्थ्यांनी शुल्क भरणा केले आहे.
यावर्षी केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत (कॅप) प्रवेशाच्या चार फेऱ्या घेण्यात येणार आहेत. पहिल्या फेरीसाठी पहिला विकल्प, दुसऱ्या फेरीसाठी पहिले तीन विकल्प, तिसऱ्या फेरीसाठी पहिले सहा विकल्प तर चौथ्या फेरीसाठी सर्व विकल्प अनिवार्य असतील. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कॅप फेरीसाठी विकल्प अर्ज भरुन केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घ्यावा, असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.
दहावीनंतर कमी कालावधीत तंत्रशिक्षण घेऊन अभियंता होण्यासाठी तंत्रशिक्षणातील पदविका अभ्यासक्रम हा एक उत्तम पर्याय आहे. हा पदविका अभ्यासक्रम 10 वी नंतर तीन वर्षांचा असतो. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रात रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होत असतात.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.