भाजपच्या वाटेवरील शिवसेनेचे सुनील बागुल यांच्यावरील गुन्हा पोलिसांनीच घेतला मागे !
नाशिक : खरा पंचनामा
शिवसेना उपनेते सुनील बागुल आणि महानगरप्रमुख मामा राजवाडे भाजपच्या वाटेवर आहेत. या प्रवेशाला कारणीभूत ठरलेला दरोड्याचा गुन्हा अचानक पोलिसांनी मागे घेतला आहे. त्यामुळे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षातील राजकीय वादात पोलिसांची भूमिका वादाचा विषय ठरली आहे.
दोन आठवड्यांपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपनेते सुनील बागुल आणि महानगर प्रमुख मामा राजवाडे यांसह त्यांचे विविध समर्थक भाजप प्रवेश करणार होते. त्याला किशोर उर्फ गाजू घोडके यांनी दाखल केलेला दरोड्याचा गुन्हा कारणीभूत होता. या गुन्ह्यात अटक अटळ असल्याने ती टाळण्यासाठी श्री बागुल आणि त्यांचे समर्थक भाजप प्रवेश करणार अशी चर्चा सुरू झाली होती. श्री. बागुल आणि त्यांच्या समर्थकांच्या प्रवेशात शिवसेना नेते संजय राऊत यांच्या एंट्रीने भाजप बॅक फुटवर गेला होता. या नेत्यांच्या प्रवेशात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची मोठी भूमिका होती. यापूर्वीही शिवसेनेच्या वादग्रस्त नेत्यांना प्रवेश देण्याचे मंत्री महाजन यांनी जाहीरपणे समर्थन केले होते.
पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात प्रवेश करणारे सुनील बागुल आणि त्यांचे सहकारी पोलिसांच्या दृष्टीने फरारी होते. फरार नेते दिवसाढवळ्या मुंबई भाजपच्या कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश कसा करू शकतात? असा प्रश्न राऊत यांनी केला होता. त्यामुळे ऐनवेळी धावपळ करीत आणि प्रवेश बाबत सर्व सराव करीत भाजपने हे प्रवेश स्थगित केले होते.
या प्रकरणात तक्रार करणारे गजू घोडके यांनी पुरवणी जबाब दिला आहे. त्यात चोरीला गेलेली सोन्याची साखळी घरातच सापडली असा दावा त्यांनी केला. त्यावर पोलिसांनी लगेचच विश्वास ठेवत दरोड्याचा गुन्हा रद्द केला. प्रकरणात अदाखल पात्र गुन्हा असल्याने शिवसेना उपनेते बागुल आणि त्यांच्या समर्थकांचा प्रवेश सुरळीत पार पडणार आहे.
यावर श्री बागुल यांनी आपल्यावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने अविश्वास दाखवला. आपल्यावर दाखल गुन्ह्यांचा भाजप प्रवेशाशी काहीही संबंध नव्हता. मात्र तरीही कारवाई झाल्याने आता आम्ही शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात नाही. त्यामुळे पक्षावर नाराज नसलो तरी पुढील निर्णय घेण्यास आम्ही सक्षम आणि स्वतंत्र आहोत, अशी सूचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
या सर्व राजकीय घडामोडी घडत असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाशिकच्या पोलिसांवर गंभीर आरोप केला होता. नाशिकचे पोलीस शिवसेनेच्या नेत्यांचा भाजप प्रवेश व्हावा म्हणून जाणीवपूर्वक गुन्हे दाखल करतात. त्याचा हेतू राजकीय असल्याचा दावा केला होता. सुनील बागुल प्रकरणातील राजकीय आणि पोलिसांच्या घडामोडी विचारात घेता राऊत यांच्या आरोपाला पोलिसांच्या कृतीने एक प्रकारे अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.