सांगलीचा पारा वाढतोय; वाढत्या उन्हात आरोग्य जपण्यासाठी 'हे' नियम पाळा!
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
मार्च महिना संपून एप्रिलची सुरुवात होत असतानाच सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. सांगली जिल्ह्याचा पारा ४० अंशांच्या पार गेल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन विविध आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, उन्हाळ्याचा त्रास टाळण्यासाठी आहारात बदल करणे आणि आरोग्याची काळजी घेणे अनिवार्य झाले आहे.
उन्हाळ्यातील संभाव्य आजार
कडक उन्हामुळे शरीरातील पाण्याचे आणि क्षारांचे संतुलन बिघडल्याने खालील समस्या उद्भवू शकतात:
त्वचेचे आजार, डोकेदुखी आणि चक्कर येणे. लहान मुलांमध्ये कांजण्या, गोवर आणि पोटाचे विकार. डोळे येणे, लघवीच्या मार्गाचे संसर्ग आणि सतत थकवा जाणवणे. अति उष्णतेमुळे उष्माघात (Heat Stroke) होण्याची दाट शक्यता.
निरोगी राहण्यासाठी 'हे' करा (आरोग्य मंत्र)
🌞 पाण्याचे सेवन वाढवा:
दिवसभरात किमान २ ते ३ लिटर पाणी प्यावे. तहान लागण्याची वाट न पाहता मधूनमधून पाणी पिणे गरजेचे आहे. फ्रिजमधील थंड पाण्याऐवजी माठातील नैसर्गिक थंड पाणी किंवा वाळ्याचे पाणी पिणे आरोग्यासाठी अधिक हितकारक आहे. तसेच नारळ पाणी, उसाचा रस आणि लिंबू सरबत यांचा समावेश करावा.
🌞 आहारात दही आणि ताकाचा वापर:
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी दही आणि ताक हे सर्वोत्तम पर्याय आहेत. यामुळे शरीराला आवश्यक प्रथिने आणि पचनासाठी उपयुक्त बॅक्टेरिया मिळतात.
☀️. ताजी फळे आणि भाज्या:
पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे उदा. कलिंगड, संत्री, मोसंबी, काकडी यांचे सेवन करावे. जेवणात पांढरा कांदा आणि पुदिन्याचा वापर केल्यास शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते.
☀️ पुरेशी झोप आणि व्यायाम:
वेळेवर आणि हलका आहार घ्यावा. पुरेशी झोप घेतल्याने उन्हाळ्याचा थकवा कमी होतो. शरीराचे तापमान स्थिर ठेवण्यासाठी दररोज प्राणायाम आणि अनुलोम-विलोम करणे फायदेशीर ठरते.
तज्ज्ञांचा सल्ला :
"सध्या उन्हाचा पारा वाढल्याने पचनशक्ती कमी होते आणि भूक लागत नाही. अशा वेळी शरीरातील बल टिकवून ठेवण्यासाठी सकस आहार आणि सतत पाणी पिणे आवश्यक आहे. दुपारी उन्हात फिरणे टाळावे."
— डॉ. श्रेया शेंडे (बीएएमएस, आयुर्वेदचार्य)
सावधानता बाळगा, सुरक्षित राहा! उन्हाळ्याच्या या दोन महिन्यांत निसर्गाच्या बदलाला सामोरे जाताना स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे हीच काळाची गरज आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.