ऑपरेशन टायगरमध्ये मोठा ट्विस्ट
ओमराजे निंबाळकर शिंदेंची साथ सोडणार? कोर्टाच्या निकालनंतर सस्पेन्स वाढला
मुंबई : खरा पंचनामा
पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल कोर्टाने दिला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह नऊही आरोपींची कोर्टानं निर्दोष मुक्तता केली.
या निकालानंतर आता ऑपरेशन टायगरमध्ये मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. कारण ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. आपल्या वडिलांच्या हत्येचा निकाल आपल्या बाजुने लागल्यानंतर ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत जाणार असल्याची चर्चा होती.
मात्र आता हा निकाल ओमराजे यांच्या विरोधात गेला आहे. यामुळे आता ओमराजे निंबाळकर एकनाथ शिंदेंची साथ सोडणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या निकालानंतर ओमराजे निंबाळकर यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यात त्यांनी आपण अद्याप पक्ष सोडला नाही, असं सूचक वक्तव्य केलं आहे.
आपण आपल्या मतदारसंघात जाणार असून कार्यकर्त्यांची भावना समजून घेऊनच या पक्षांतराबाबत निर्णय घेणार असल्याचं ओमराजेंनी म्हटलं आहे. मी दोन दिवसांनी पक्षांतराबाबत निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. ओमराजेंच्या या वक्तव्यानंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. ते एकनाथ शिंदेंची साथ सोडणार आणि ऑपरेशन टायगरमधून माघार घेणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहे.
ओमराजे निंबाळकर यांनी ऑपरेशन टायगरमधून माघार घेतली तर पक्षांतर करण्यासाठी आवश्यक असलेला दोन तृतीयांशचा आकडा गाठणं शिंदेंसाठी अशक्य होणार आहे. परिणामी हे ऑपरेशन फेल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता ओमराजे निंबाळकर मतदारसंघात जाऊन काय निर्णय घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
या निकालानंतर ओमराजे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, या निकालावर पक्षांतर करण्याचं काहीही अवलंबून नव्हतं. मी हायकोर्टात जाऊन दाद मागणार आहे. शिंदेसेनेत जाण्याबाबत अद्याप निर्णय घेतला नाही. मतदारसंघात जाऊन चर्चा करून निर्णय घेणार आहे. ओमराजेंच्या वक्तव्यानंतर इतर खासदारांची धाकधूक वाढली आहे. ओमराजेंच्या भूमिकेबाबत संभ्रम असल्याने 'ऑपरेशन टायगर' बाबत सस्पेन्स वाढला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.