Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आरटीओ अधिकाऱ्याला मारहाण केल्याने राजकीय पदाधिकाऱ्याला पोलीस कोठडी

आरटीओ अधिकाऱ्याला मारहाण केल्याने राजकीय पदाधिकाऱ्याला पोलीस कोठडी

पनवेल : खरा पंचनामा 

तळोजा औद्योगिक वसाहतीत क्षमतेपेक्षा जास्त वजनाची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केल्यानंतर आरटीओच्या अधिकाऱ्याला धमकावत मारहाण केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी तळोजा पोलिसांनी एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण करणे आणि धमकी देणे यांसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

प्रादेशिक परिवहन विभागाच्या भरारी पथकाकडून तळोजा औद्योगिक वसाहतीतील मुख्य रस्त्यावर अॅपकोटेक्स कंपनीसमोर वाहन तपासणी मोहीम राबविण्यात येत होती. या वेळी एमएच-४६-एफ-२६४१ क्रमांकाच्या वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनातून निर्धारित क्षमतेपेक्षा चार टन अधिक वजनाची वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. तसेच वाहनाची कागदपत्रे तपासल्यानंतर मार्च २०२३ नंतर वाहन कर भरलेला नसल्याचे समोर आले.

याशिवाय प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र, विमा, योग्यता प्रमाणपत्र, परवाना आणि राष्ट्रीय परवाना अधिकृततेची वैधता संपल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे आरटीओच्या भरारी पथकाने ई-चलनद्वारे ५० हजार ५०० रुपयांचे तडजोड शुल्क आकारून कारवाई केली. या कारवाईमुळे संतप्त झालेल्या वाशी जुहू गाव येथील सेक्टर ११ मधील राधेकन्हैया निवासातील नितीन रॉय (वय २५) याने संबंधित आरटीओ अधिकाऱ्यांशी वाद घालून त्यांना मारहाण केल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. तसेच अधिकाऱ्यांना जातीवाचक शिवीगाळीच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच तळोजा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अजयकुमार मोहिते यांनी रॉय याला ताब्यात घेतले. पोलिसांना रॉय याने तो राजकीय पक्षाचा पुढारी असल्याचे सांगीतले.

त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १३२, १२१(१), ३५२, ३५१(२) आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक मोहीते यांनी दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.