Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगली जिल्ह्यातून ईश्वरपूर, कुंडल येथील दोन टोळ्या तडीपारपोलीस अधीक्षक तुषार दोशींची धडक कारवाई

सांगली जिल्ह्यातून ईश्वरपूर, कुंडल येथील दोन टोळ्या तडीपार
पोलीस अधीक्षक तुषार दोशींची धडक कारवाई

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून त्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सांगली पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. कुंडल पोलीस ठाणे हद्दीतील प्रदिप जाधव टोळीला २ वर्षांसाठी, तर ईश्वरपूर पोलीस ठाणे हद्दीतील आकाश पाटील टोळीला ३ महिन्यांसाठी सांगली जिल्ह्यातून हद्दपार (तडीपार) करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी जारी केले आहेत.
कुंडल येथील 'प्रदिप जाधव टोळी' २ वर्षांसाठी हद्दपार
कुंडल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुपारी वसाहत (पलूस) येथील प्रदिप विरसिंग जाधव (वय २३, टोळी प्रमुख), ओंकार हणमंत बोडरे (वय २१) आणि संदीप विरसिंग जाधव (वय २४) या तिघांच्या टोळीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
या टोळीविरुद्ध सन २०२२ ते २०२५ या कालावधीत बलात्कार करणे, बेकायदेशीर जमाव जमवून घातक हत्यारांनी गंभीर दुखापत करणे, तसेच चारचाकी व मोटारसायकल चोरीसारखे शरिराविरुद्धचे आणि मालमत्तेविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. कायद्याला न जुमानणाऱ्या या टोळीविरुद्ध कुंडल पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये प्रस्ताव सादर केला होता. तासगाव उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांनी या प्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर नैसर्गिक न्यायतत्वांचा विचार करून पोलीस अधीक्षकांनी या टोळीला २ वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार केले.

ईश्वरपूर येथील 'आकाश पाटील टोळी' ३ महिन्यांसाठी तडीपार
ईश्वरपूर पोलीस ठाणे हद्दीतील अशोकनगर, साखराळे (ता. वाळवा) येथील आकाश हणमंत पाटील (वय २४, टोळी प्रमुख), स्वागत लक्ष्मण शिंदे (वय २२), अक्षय विकास मोरे (वय ३१), आशिष हणमंत पाटील (वय २४) आणि समीर अमीर खानजादे (वय २५) या पाच जणांच्या टोळीला ३ महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. या टोळीवर सन २०२० ते २०२५ या काळात अल्पवयीन मुलीचे अपहरण करणे, बेकायदेशीर मंडळी जमवून मारहाण व जीवे मारण्याची धमकी देणे, घातक हत्यारांनी दुखापत करणे आणि विनापरवाना विदेशी दारू बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. ईश्वरपूर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रस्तावानंतर, ईश्वरपूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी केली. त्यांच्या अहवालावरून या पाचही जणांवर ३ महिन्यांच्या तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार
पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले व अरुण पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक संजीव झाडे, ईश्वरपूरचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, कुंडलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश काशीद यांच्यासह पोलीस अंमलदार बसवराज शिरगुप्पी, दीपक गट्टे, राज हांडे, निलेश यादव आणि विशाल साळुंखे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

पोलीस प्रशासनाचा इशारा:
जिल्ह्यात संघटितपणे गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांवर यापुढेही बारकाईने नजर ठेवून अशाच प्रकारची कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.