Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत एलसीबीची मोठी कारवाई; ५ देशी पिस्टल व ५ जिवंत काडतुसांसह दोघांना अटक!

सांगलीत एलसीबीची मोठी कारवाई; ५ देशी पिस्टल व ५ जिवंत काडतुसांसह दोघांना अटक!

पूजा फडके 
मिरज : खरा पंचनामा 

सांगली जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या पथकाने मिरजेत धडक कारवाई करत शस्त्रविक्रीसाठी आलेल्या दोन तरुणांना अटक केली. त्यांच्याकडून एकूण २,५१,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

एलसीबीच्या पथकातील पोलीस अंमलदार अमोल ऐदाळे यांना बातमीदाराकडून अत्यंत गोपनीय माहिती मिळाली होती. मिरज शहरातील कमानवेस ते रमामातानगर ऑक्सिजन पार्ककडे जाणाऱ्या रोडवर दोन इसम सॅकमध्ये पिस्टल घेऊन ते विकण्यासाठी येणार आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर परिसरात पाळत ठेवली. एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीसमोर सॅक घेऊन संशयास्पद रित्या थांबलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी वेढा टाकून ताब्यात घेतले. त्यांची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे कोणत्याही परवान्याशिवाय बेकायदेशीररित्या बाळगलेली शस्त्रे आढळून आली.

अटक केलेले व फरार आरोपी : 
अश्विन संजय माळी (वय २६ वर्षे, रा. माळीनगर, कडेगाव, जि. सांगली). (याच्या सॅक मधून ४ पिस्टल आणि ४ जिवंत काडतुसे जप्त),अमन ऊर्फ मोहीद्दीन बशीर गोदड (वय २६ वर्षे, रा. टाकळी रोड, पटवर्धन मळा, मिरज). (याच्या कमरेला १ पिस्टल आणि खिशात १ जिवंत काडतूस जप्त), फरार आरोपी (शोध सुरू):सुरज जगन्नाथ मोहिते (रा. सोहली, ता. कडेगाव, जि. सांगली), अक्षय पाटील (रा. वाई, ता. वाई, जि. सातारा) असे आहेत.

जादा दराने विक्री करण्याचा होता डाव
पोलिसांनी आरोपी अश्विन माळी याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने ही शस्त्रे जादा दराने विकण्यासाठी आणल्याची कबुली दिली. यातील २ पिस्टल व २ काडतुसे त्याने सुरज मोहिते (कडेगाव) याच्याकडून, तर ३ पिस्टल व ३ काडतुसे अक्षय पाटील (वाई, सातारा) याच्याकडून खरेदी केली होती. त्याने मिरजेतील अमन गोदड याला एक पिस्टल व काडतूस विकले होते, तर उर्वरित ४ पिस्टल तो विकण्याच्या तयारीत होता.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
५ देशी बनावटीचे पिस्टल (अग्नीशस्त्रे) – किंमत रु. २,५०,०००/-.
५ जिवंत काडतुसे (राऊंड) – किंमत रु. १,०००/-.
एक मेहदी रंगाची सॅक – किंमत रु. ५००/-.
 एकूण जप्त मुद्देमाल: रु. २,५१,५००/-.

मिरज शहर पोलिसांत गुन्हा दाखल
या प्रकरणी एलसीबीचे पोलीस नाईक श्रीधर महादेव बागडी यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, आरोपींविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम (आर्म ॲक्ट) कलम ३, २५ व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३)/१३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास मिरज शहर पोलीस करत आहेत.

एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पोवार, अमित परिट, अमोल ऐदाळे, सोमनाथ गुंडे, आमसिध्द खोत, प्रकाश पाटील, अमोल लोहार, संदीप पाटील, श्रीधर बागडी, अनंत कुडाळकर, सायबर पोलीस ठाण्याचे कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर, अजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.