45 वर्षीय नराधमाला फाशीची शिक्षा
करजगी अल्पवयीन बालिका हत्या प्रकरण : जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांचा जोरदार युक्तिवाद
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
करजगी (ता. जत, जि. सांगली) येथे ४ वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या आरोपी पांडुरंग सोमन्ना कळळी (वय ४५) याला सांगली सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. ४ श्रीमती जे. ए. मोहांती यांनी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी काम पाहिले. या खटल्यात भोकरे यांनी जोरदार युक्तिवाद करत आरोपीला कडक शिक्षेची मागणी केली होती.
ही घटना ६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०:३० ते दुपारी १:३० दरम्यान घडली. घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकलीला आरोपीने स्वतःच्या घरात नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केले व तिचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचे प्रेत पोत्यात भरून घरातील लोखंडी पेटीत लपवून ठेवले होते.
उमदी पोलिस ठाण्याचे तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे आणि सहायक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांनी सखोल तपास करून अवघ्या १३ दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या प्रकरणात एकूण १५ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. डीएनए अहवाल, वैद्यकीय पुरावे आणि रक्ताचे डाग यांसारख्या परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी सरकारी पक्षातर्फे मांडण्यात आली. जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रमोद अंकुश भोकरे आणि फिर्यादीतर्फे ॲड. तोहिद रियाज जमादार यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.
हा गुन्हा अत्यंत क्रूर आणि विकृत मानसिकतेतून घडलेला असल्याने न्यायालयाने याला दुर्मिळातील दुर्मिळ प्रकार मानत आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. कायद्याचा धाक निर्माण व्हावा आणि अशा विकृतीला पायबंद बसावा, यासाठी हा निकाल देण्यात आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.