महापालिकेच्या अग्निशमन अधिकाऱ्याविरोधात २६.६० लाखांच्या अपसंपदा प्रकरणी गुन्हा दाखल!
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागातील वर्ग-३ चे कर्मचारी विजय आनंदराव पवार (वय ५९ वर्ष) यांच्याविरुद्ध उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा २६,६०,५८७ रुपये (२६ लाख ६० हजार ५८७ रुपये) अधिकची (म्हणजेच सुमारे ३२.६८ टक्के) अपसंपदा बाळगल्याप्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यास्मिन इनामदार (पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सांगली) यांनी केलेल्या कारवाईनंतर विजय पवार यांच्या मालमत्तेची उघड चौकशी करण्यात आली होती. या चौकशीदरम्यान, १ जुलै २००८ ते २८ जून २०२३ या कालावधीत विजय पवार यांनी आपल्या अधिकृत उत्पन्नापेक्षा ३२.६८% अधिक मालमत्ता अप्रामाणिक आणि भ्रष्ट मार्गाने जमवल्याचे निष्पन्न झाले.
सांगली शहर पोलीस ठाण्यात 'भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८' च्या कलम १३(१)(ई) व १३(२) आणि सुधारित अधिनियम २०१८ च्या कलम १३(१)(ब) सह १३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीस 'भारतीय नागरिक सुरक्षा संहिता' कलम ३५(३) अन्वये नोटीस बजावण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस उप अधीक्षक श्रीमती यास्मिन इनामदार यांच्या पर्यवेक्षनाखाली तसेच पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.