लक्ष बिहारच्या प्रशांत किशोरांकडे; पण काँग्रेसने 'या' राज्यात भाजपचा गेम केला !
भोपाळ : खरा पंचनामा
तीन राज्यातील तीन विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सगळ्यांचे लक्ष बिहारमधील बांकीपूर पोटनिवडणुकीकडे लागले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी मागील विधानसभा निवडणुकीत ही जागा जिंकली होती.
त्यानंतर राज्यसभेवर गेल्याने त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. या पोटनिवडणुकीत जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष प्रशांत किशोर मैदानात उतरल्याने राजकारण चांगलंच तापलं होतं. मात्र, या निवडणुकीत बेदखल असलेल्या काँग्रेसने भाजपला झटका दिला आहे.
भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशात काँग्रेसने भाजपला धक्का देण्याची तयारी केली आहे. दतिया पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवाराने भाजप विरोधात निर्णायक आघाडी घेतली आहे. मतमोजणीच्या ९ व्या फेरीत काँग्रेसच्या घनश्याम सिंह यांना ४४,९५८ मते मिळाली. तर, भाजपच्या आशुतोष तिवारी यांना ३५,४३९ मते मिळाली. तर, आझाद समाज पार्टीचे (कांशीराम) उमेदवार दामोदर यादव यांना १२,१६९ मते मिळाली. काँग्रेसच्या घनश्याम सिंह यांनी आता जवळपास १० हजार मतांची आघाडी घेतली आहे.
मतमोजणीच्या १५ फेऱ्या पार पडणार आहेत. त्यामुळे हाच कल राहिल्यास काँग्रेस विजयाचा गुलाल उधळू शकते.
या पोटनिवडणुकीच्या निकालांचा मध्य प्रदेश सरकार स्थिरतेवर कोणताही परिणाम होणार नसला, तरी ही निवडणूक राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. भाजपचे माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यांच्याऐवजी भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) पार्श्वभूमी असलेल्या आशुतोष तिवारी यांच्यावर विश्वास दर्शवला. मिश्रा यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली होती. मिश्रा समर्थकांनी भाजपविरोधातच आक्रमक आंदोलने केली होती. त्यामुळे दतिया विधानसभेची निवडणूक लक्षवेधी ठरली.
दतिया विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार राजेंद्र भारती यांना दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू न्यायालयाने ग्रामीण बँकेतील फसवणुकीच्या एका जुन्या प्रकरणात तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा सुनावल्यानंतर लगेचच विधानसभा सचिवालयाने तत्परतेने पावले उचलत त्यांच्या अपात्रतेबाबत राजपत्र अधिसूचना जारी केली आणि त्यानंतर दतियाची जागा रिक्त असल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे, राजेंद्र भारती यांनी याच जागेवरून भाजपचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री नरोत्तम मिश्रा यांचा पराभव केला होता.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.