E20 पेट्रोलविरोधात युवक काँग्रेसचं गडकरींच्या घरासमोर आंदोलन !
शेकडो कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
नागपूर : खरा पंचनामा
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील निवासस्थानाबाहेर राजकीय वातावरण अचानक कमालीचे तापले आहे. नीट (NEET) पेपर लीक प्रकरणावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दबावापुढे अखेर केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. भाजप सरकारच्या या कार्यकाळातील हा पहिलाच मंत्र्याचा राजीनामा ठरला.
शिक्षणमंत्र्यांची खुर्ची गेल्यानंतर आता मोदी सरकारमधील दुसऱ्या एका ज्येष्ठ मंत्र्याविरोधात विरोधकांनी थेट एल्गार पुकारला आहे. केंद्रातील वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आता इथेनॉलचा मुद्दा चांगलाच भोवण्याची चिन्हे दिसत असून त्यांच्या नागपूर येथील घरासमोर युवक काँग्रेस आणि एनएसयूआयच्या (NSUI) कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली आहेत.
नागपूर शहर युवक काँग्रेसतर्फे आयोजित या 'जनआक्रोश घेराव' आंदोलनांतर्गत दुपारी मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी नितीन गडकरी यांच्या घराच्या दिशेने कूच केले. वाहनांमध्ये सक्तीने वापरल्या जाणाऱ्या E20 (इथेनॉल मिश्रित) पेट्रोलला तीव्र विरोध दर्शवत हे आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनामध्ये युवक काँग्रेस आणि NSUI चे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले.
गडकरी यांच्या घराबाहेर जमा झालेला मोठा जमाव आणि आंदोलकांचा रोष पाहता पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. केंद्रीय मंत्र्यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या आंदोलक कार्यकर्त्यांना रोखत पोलिसांनी अनेक युवक काँग्रेस आणि NSUI कार्यकर्त्यांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले.
यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करणारे युवक काँग्रेस नेते मेहुल अडवाणी म्हणाले, "आमच्यावर जबरदस्तीने E20 पेट्रोल लादले जात आहे आणि आम्ही या निर्णयाचा तीव्र निषेध करतो. ही जनतेवर होणारी सक्ती असून याविरोधात आमचा लढा असाच सुरू राहील."
गेल्या काही दिवसांपासून E20 इथेनॉल मिश्रित इंधनाच्या वापरावरून नितीन गडकरी यांच्यावर सातत्याने टीका होत होती. या जनआक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून केवळ इंधनाचा प्रश्नच नाही, तर देशातील शिक्षण व्यवस्था, विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न, सतत वाढणारी बेरोजगारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवर केंद्र सरकारने आपले मौन सोडावे, अशी आक्रमक मागणी विरोधकांकडून लावून धरण्यात आली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.