'एमपीएससी'मध्ये अध्यक्ष, सदस्यापासून जिल्हा यंत्रणेपर्यंत नेमके काय बदल होणार?
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) ही संविधानिक संस्था असली तरी गेल्या काही वर्षांत परीक्षा प्रक्रियेबाबत वाढलेल्या तक्रारी आणि उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या सूचनांच्या पार्श्वभूमीवर आयोगाच्या संपूर्ण परीक्षा व्यवस्थेत बदल करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
आयोगाचे अध्यक्ष, सदस्य, सचिव यांच्यापासून परीक्षा नियंत्रित करणारी यंत्रणा आणि जिल्हा पातळीवरील परीक्षा अधिकाऱ्यांपर्यंत विविध स्तरांवर सुधारणा करण्याची गरज असल्याचे अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी बुधवारी स्पष्ट केले.
राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीची बैठक बुधवारी नागपुरात झाली. बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना राधा यांनी समितीच्या कामकाजाची दिशा स्पष्ट केली.
विविध भरती परीक्षांमध्ये निर्माण झालेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात सूचना प्राप्त झाल्या आहेत. या सूचनांचा विचार केवळ प्रश्नपत्रिका किंवा परीक्षा केंद्रांच्या व्यवस्थेपुरता मर्यादित न ठेवता आयोगाच्या अंतर्गत कार्यपद्धतीचाही सखोल अभ्यास केला जाणार आहे. अध्यक्ष, सदस्य, सचिव, परीक्षा नियंत्रक यंत्रणा तसेच जिल्हा पातळीवर परीक्षा घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्य जबाबदाऱ्या आणि कार्यपद्धतीचाही त्यात समावेश असेल. परीक्षा प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर जबाबदारी निश्चित करणे,गोपनीयता अधिक मजबूत करणे आणि परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणणे यावर समितीचा भर राहणार आहे. यातील काही उपाययोजना तातडीने, तर काही दीर्घकालीन स्वरूपाच्या असतील. विविध जिल्ह्यांमध्ये बैठका घेऊन विद्यार्थ्यांच्या सूचनांचा आढावा घेतल्यानंतर तीन महिन्यांत शासनाला अहवाल सादर केला जाणार आहे, असे राधा यांनी सांगितले.
समितीची बैठक केवळ विद्यार्थ्यांच्या सूचना ऐकून घेण्यापुरती मर्यादित नसून त्यावर ठोस कार्यवाहीचा आराखडा तयार केला जाणार आहे. आतापर्यंत ७,६०० जणांनी लेखी स्वरूपात सूचना, तर सुमारे १८ हजार ई-मेलद्वारे सूचना प्राप्त झाल्या आहेत. या सर्व सूचनांचा अभ्यास करून परीक्षा व्यवस्थेतील आवश्यक बदलांचा नियोजनबद्ध अहवाल तयार केला जाणार आहे. परीक्षा व्यवस्थेतील सर्व बदल एकाचवेळी करणे शक्य नसल्याने काही उपाययोजना तातडीने, तर काही दीर्घकालीन स्वरूपात राबवाव्या लागतील. त्यासाठी प्रशासकीय तसेच धोरणात्मक पातळीवर निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे राधा यांनी स्पष्ट केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.