"मला सुशिक्षितांपेक्षा क्रिमिनल अन् अंडरवर्ल्डकडून ९२ टक्के मते मिळाली!"
नागपूर : खरा पंचनामा
आपल्या बेधडक आणि रोखठोक वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी पुन्हा एकदा एका वक्तव्यातून चर्चेत आले आहेत. नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपल्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी सांगताना एक अत्यंत धक्कादायक दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी म्हटले की, लोकसभा निवडणुकीत त्यांना सुशिक्षित मतदारांचा भाग असलेल्या मतदारांकडून फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला भाग, अंडरवर्ल्ड आणि रेड लाईट एरियाशी संबंधित भागांतून सर्वाधिक मतदान झाले. सुशिक्षित भागांतून त्यांना ७० ते ७५ टक्के मतदान झाले, तर गुन्हेगारी आणि अंडरवर्ल्डशी संबंधित भागांत तब्बल ९२ टक्के मते मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
या वक्तव्यानंतर गैरसमज पसरू नये म्हणून नितीन गडकरी यांनी तात्काळ स्पष्टीकरणही दिले. "अशा भागातून ९२ टक्के मतदान झाले याचा अर्थ माझे त्या लोकांशी कौटुंबिक किंवा वैयक्तिक संबंध आहेत किंवा मी त्यांच्या अवैध कामांचे समर्थन करतो असा अजिबात काढू नये," असे गडकरी यांनी स्पष्ट केले.
आपल्याला मिळालेल्या या भरभरून मतांचे कारण सांगताना गडकरी म्हणाले की, त्या भागांतील रस्ते, मूलभूत सुविधा आणि सामाजिक विकासाची कामे त्यांनी प्रामाणिकपणे केली. विकासाच्या याच कामांमुळे तेथील नागरिकांनी आपल्याला जात-धर्म किंवा इतर गोष्टी न पाहता मतदान केले. गडकरी यांच्या या वक्तव्यामुळे सध्या राजकारणात आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.