डब्यातील कांदा-लसणाच्या वादाने घेतले गंभीर वळण; नरेंद्र मेहता यांच्या शाळेला शिक्षण विभागाचा दणका
मुंबई : खरा पंचनामा
मिरा रोड येथील सेव्हन इलेव्हन शाळेच्या एका संदेशामुळे सुरू झालेला वाद आता प्रशासकीय पातळीवर पोहोचला आहे. पर्युषण पर्वाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा, लसूण, बटाटा, बीट, मुळा यांसारखे कंदमूळ पदार्थ आणू नयेत, असे आवाहन शाळेकडून पालकांना करण्यात आले होते. या संदेशावरून विविध स्तरांतून आक्षेप नोंदवण्यात आल्यानंतर अखेर शाळेने हा संदेश मागे घेतला होता.
या प्रकरणामुळे मिरा-भाईंदरच्या शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. शाळेने विद्यार्थ्यांच्या आहाराबाबत अशा प्रकारचे आवाहन करणे योग्य आहे का, तसेच धार्मिक परंपरा आणि विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आहाराच्या निवडी यामध्ये शाळेची भूमिका कितपत असावी, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह विविध राजकीय पक्षांकडूनही या प्रकरणावर आक्षेप घेण्यात आला.
दरम्यान, वाढता वाद लक्षात घेऊन शाळेने आपला पूर्वीचा संदेश मागे घेतला. आमदार नरेंद्र मेहता यांनीही शाळेकडून कोणतीही सक्ती करण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले होते. पर्युषण काळात सात्त्विक वातावरण राखण्याच्या उद्देशाने पालकांना केवळ विनंती करण्यात आली होती, असा त्यांचा दावा होता.
या प्रकरणाची दखल मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागानेही घेतली होती. संबंधित तक्रारींच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्यांकडे चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे शाळेच्या भूमिकेबाबत शिक्षण विभागाकडून नेमकी कोणती पावले उचलली जातात, याकडे लक्ष लागले होते.
आता या संपूर्ण प्रकरणाला अधिकृत प्रशासकीय वळण मिळाले आहे. ठाणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांनी ११ सप्टेंबर रोजी सेव्हन इलेव्हन शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. विद्यार्थ्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर धार्मिक कारणांवरून निर्बंध लादणे तसेच त्यांच्यावर मानसिक दबाव निर्माण करणे हे बालकांच्या हक्कांशी संबंधित तरतुदींशी विसंगत ठरू शकते, असे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. शाळेला दोन दिवसांत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, खुलासा समाधानकारक नसल्यास शालेय संहिता तसेच बालकांच्या हक्कांशी संबंधित कायद्यांनुसार कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
