Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कबड्डीत पुणे ग्रामीणच्या पुरुष, महिला गटाला विजेतेपद ५२ व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचा चौथा दिवस उत्साहात

कबड्डीत पुणे ग्रामीणच्या पुरुष, महिला गटाला विजेतेपद 
५२ व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचा चौथा दिवस उत्साहात 

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विश्रामबाग येथील पोलीस मुख्यालय मैदानावर सुरू असलेल्या ५२ व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६ चा चौथा दिवस अत्यंत उत्साहात संपन्न झाला. शहीद अशोक कामटे क्रीडा नगरीत होत असलेल्या या क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर परिक्षेत्रातील ६ विविध घटकांमधील एकूण ११५० खेळाडू सहभागी झाले आहेत.

चौथ्या दिवशी पार पडलेल्या विविध वैयक्तिक ॲथलेटिक स्पर्धांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. पॉवर लिफ्टिंगच्या विविध वजनी गटांसह ५००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत पुरुषांमधून साताराचे हर्षवर्धन दबडे आणि महिलांमधून पुणे ग्रामीणच्या ऋतुजा कांबळे यांनी बाजी मारली. याशिवाय १०० मीटर अडथळा शर्यतीत साताराची वैष्णवी शिंदे, ट्रिपल जंपमध्ये साताराचे सी. एस. मर्डे, ११० मीटर अडथळा शर्यतीत पुणे ग्रामीणचे विशाल शिंदे, महिला भालाफेकमध्ये सोलापूर ग्रामीणच्या रेखा नायकवाडे तर पुरुष भालाफेकमध्ये पुणे ग्रामीणचे अंकित पवार विजेते ठरले.
सांघिक खेळांचे सामने साखळी पद्धतीने खेळवले जात असून, आज पार पडलेल्या पुरुष व महिला गटातील उपांत्य सामने तसेच कबड्डी पुरुष आणि महिला गटाच्या अंतिम सामन्यात पुणे ग्रामीणचा संघ विजयी ठरला आहे.

या क्रीडा स्पर्धेचा सांगता व बक्षीस वितरण सोहळा दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास संपन्न होणार आहे. या सोहळ्याला आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रीमती तेजस्विनी सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडेल. तसेच सोलापूर शहरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक निलोत्पल, साताराचे पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
हा बक्षीस वितरण व समारोप सोहळा नागरिकांना प्रत्यक्ष पाहता येणार असून, जास्तीत जास्त क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवावा, असे आवाहन सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.