Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भ्रष्टाचाराविरोधात दक्षता जनजागृती सप्ताह; नागरिकांनी तक्रारी नोंदवण्याचे आवाहन२६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान आयोजन : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जनजागृती मोहीम

भ्रष्टाचाराविरोधात दक्षता जनजागृती सप्ताह; नागरिकांनी तक्रारी नोंदवण्याचे आवाहन
२६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान आयोजन : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जनजागृती मोहीम

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

केंद्रीय दक्षता आयोगाच्या सूचनेनुसार देशभरात २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहानिमित्त भ्रष्टाचाराविरोधात जनजागृती करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नागरिकांनी भ्रष्टाचाराविरोधात जागरूक राहून लाच मागणाऱ्या किंवा शासकीय पदाचा गैरवापर करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात निर्भयपणे तक्रार करावी, असे आवाहन सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.

शासकीय कार्यालयांमध्ये पारदर्शकता वाढविणे, भ्रष्टाचाराला आळा घालणे आणि नागरिकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. या कालावधीत शासकीय कार्यालयांच्या ठिकाणी भ्रष्टाचारविरोधी घोषवाक्यांचे बॅनर व स्टिकर्स लावून जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांशी थेट संवाद साधून भ्रष्टाचारासंदर्भातील तक्रार प्रक्रियेची माहिती दिली जाणार आहे.

शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने आपल्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा अधिक मालमत्ता जमा केली असल्यास त्याबाबत नागरिक तक्रार करू शकतात. अशा प्रकरणांमध्ये संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्याच्या घर, जमीन, फ्लॅट, प्लॉट, शेतीजमीन तसेच इतर मालमत्तेबाबत प्राथमिक माहिती उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. प्राप्त तक्रारींची पडताळणी करून नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येते.

त्याचप्रमाणे शासकीय काम करून देण्यासाठी किंवा नागरिकांच्या कायदेशीर कामात अडथळे निर्माण करून लाचेची मागणी केल्यास संबंधितांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करता येते. अशा तक्रारींच्या आधारे सापळा रचून लाच स्वीकारणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येते.

शासकीय पदाचा गैरवापर करून सरकारी संपत्तीचा अपहार करणे, वैयक्तिक फायद्यासाठी अधिकारांचा वापर करणे किंवा इतरांना गैरफायदा मिळवून देणे, अशा प्रकारच्या गैरव्यवहारांविरोधातही नागरिक तक्रार नोंदवू शकतात. भ्रष्टाचार आढळून आल्यास संबंधितांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

राज्य शासनाचे अधिकारी, कर्मचारी, शासन अनुदानित संस्था, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत तसेच विविध शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचाराबाबत नागरिकांना तक्रार करता येणार आहे.

भ्रष्टाचारासंदर्भात माहिती किंवा तक्रार असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या www.acbmaharashtra.net या संकेतस्थळावरूनही तक्रार नोंदविता येणार आहे.

भ्रष्टाचारमुक्त प्रशासन निर्माण करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असून, लाच देऊ नका आणि लाच घेऊ नका, असा संदेश या जनजागृती सप्ताहातून देण्यात येणार आहे.

नागरिकांनी भ्रष्टाचाराविरोधात निर्भयपणे पुढे येऊन तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन सांगली अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस उपअधीक्षक यास्मीन इनामदार यांनी केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.