डोक्याला पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी, आमदार रत्नाकर गुट्टेसह चौघांविरुद्ध पोलीसात तक्रार; मधूसुदन केंद्रे आक्रमक
गंगाखेड : खरा पंचनामा
गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. मधूसुदन केंद्रे आणि रासपचे विद्यमान आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्यातील राजकीय वैर अधून मधून उफाळून येत असते. यातच आता पुन्हा एकदा नव्या वादाला सुरुवात झाली आहे.
नाली बांधकामाच्या वादातून नगरसेवक अॅड. मिथिलेश केंद्रे यांच्यासह चौघांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. यावरून केंद्रे-गुट्टे गटात वादाचा भडका उडाला असतानाच आता मधुसूदन केंद्रे यांनी थेट आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याविरोधात गंगाखेड पोलीसांकडे तक्रार केली आहे.
शहरात गेल्या काही दिवसापासून गुट्टे-केंद्र गटात वादावादी सुरू आहे. पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या दोन परस्परविरोधी घटनांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे व त्यांच्या चार साथीदारांविरुद्ध मध्यरात्री घरी येऊन डोक्याला पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याची लेखी तक्रार शनिवारी (ता.१७) दिली.
शहरातील ओमनगर परिसरात गुरुवारी (ता.१५) दुपारी दोन वाजता नाली बांधकामावरून वाद झाला होता. याप्रकरणी राजाभाऊ किशनराव कातकडे यांनी दिलेल्या फिर्यादीत, नाली बांधकामाच्या कारणावरून नगरसेवक अॅड. मिथिलेश मधुसूदन केंद्रे, सुभाष मुंढे, योगेश मुंढे आणि अजित शिगनाजी घोबाळे यांनी शिवीगाळ केली.
तसेच मिथिलेश केंद्रे यांनी तक्रारदार आणि त्यांच्या मुलाच्या दिशेने पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शुक्रवारी (ता.१६) गंगाखेड पोलीस स्टेशन येथे चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मिथिलेश केंद्रे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे समर्थकांसह गंगाखेड पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी पोलीसांनी दाखल केलेला गुन्हा खोटा असल्याचा आरोप करत ठिय्या आंदोलन केले.
दिलेल्या तक्रारीत, शुक्रवारी (ता.१६) मध्यरात्री १२ ते १२.४५ दरम्यान आमदार रत्नाकर गुट्टे चार साथीदारांसह वाहनातून त्यांच्या घरी आले. नगरपालिका कर्मचाऱ्याला तक्रार देण्यास का सांगितले, अशी विचारणा करीत वाद घातला. यावेळी गुट्टे यांनी आपल्या डोक्याला पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी दिली. घरातील वॉचमन आणि इतरांनी आरडाओरड केल्यानंतर संबंधित व्यक्ती तेथून निघून गेले. यावेळी वाचलास, पण पुढे तूला सोडणार नाही, मी आमदार आहे, माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही, अशी धमकी देऊन आमदार गाडीतून निघून गेले, अशी तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलीसांनी अद्याप गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली नाही.
गंगाखेड शहरात या दोन राजकीय नेत्यांमधील वादाने वातावरण तापले असून, परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक तानाजी चिखले गंगाखेड पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. दोन्ही प्रकरणांतील आरोपांचे स्वरूप गंभीर असल्याने पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.