एफडीएच्या रडारवर आता 'जेनेरिक'! औषधांच्या माध्यमातून वारेमाप लूट; सर्वेक्षणात काय आढळलं?
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये औषधे, तसेच वैद्यकीय सामग्रीच्या अवाजवी किंमतीतून सुरू असलेल्या बेबंद नफेखोरीला चाप लावण्यासाठी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आता जेनेरिक औषधांची झाडाझडती सुरू केली आहे.
बॅण्डेड औषधांच्या तुलनेमध्ये जेनेरिक औषधांच्या किंमती कमी आहेत, इतकाच मर्यादित अर्थ घेऊन औषधांच्या किंमतींचे मापदंड लावता येणार नाहीत. तर जेनेरिक औषधांचे उत्पादन, वितरण आणि प्रत्यक्ष रुग्णांना या औषधांची प्रत्यक्ष उपलब्धता होईपर्यंत त्यांच्या किंमतीवर नियंत्रण असणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात मात्र राज्यात खुल्या बाजारात अनेक ठिकाणी जेनेरिक औषधांच्या निर्धारित किंमतीचे निकष पाळले जात नाहीत. या औषधांच्या माध्यमातून वारेमाप लूट सुरू आहे. या औषधांचे उत्पादन आणि प्रत्यक्ष विक्री यामध्ये पन्नास ते शंभरपट अधिक नफेखोरी केली जाते, असे एफडीएने राज्यात यासंदर्भात सुरू केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. त्यामुळे आता बॅण्डेड औषधांसह जेनेरिक औषधांचीही झाडाझडती घेतली जाणार आहे.
'येत्या वर्षामध्ये ही मोहीम अधिक आक्रमक होणार आहे. जेनेरिक औषधांचा पर्याय हा माफक दराने सर्वसामान्यांना परवडेल, असा हवा, यादृष्टीने केंद्र सरकारकडेही या सर्वेक्षणातून दिसलेले निष्कर्ष पाठवण्यात येणार आहेत,' अशी माहिती एफडीए मधील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली. जेनेरिक औषधे ही एखाद्या मूळ बॅण्डेड औषधांप्रमाणे काम करतात. मूळ औषधांमध्ये सक्रिय घटक जेनेरिक औषधांमध्येही असतात. त्यामुळे वैद्यकीय गुण बॅण्डेड औषधांसारखा असला, तरीही त्याची किंमत फार कमी असते.
औषध कंपनीचा पेटंट कालावधी संपल्यानंतर इतर कंपन्याही तेच औषध तयार करतात, त्यावेळी त्या औषधांचे जेनेरिक रूप तयार होते. या औषधांना एफडीए किंवा केंद्रीय औषध नियामक मंडळाकडून मान्यता मिळालेली असली, तरीही गुणवत्ता चाचणीनंतर ती बाजारामध्ये उपलब्ध होतात. ही औषधे बॅण्डेड औषधांच्या तुलनेमध्ये चाळीस ते नव्वद टक्क्यांपर्यंत स्वस्त असणे अपेक्षित असते. त्यामुळे ती गरजू रुग्णांना परवडतात. दीर्घकालीन उपचार घेत असलेल्या रुग्णांसह सहआजार असलेल्या रुग्णांसाठी हा पर्याय महत्त्वाचा असतो. प्रत्यक्षात मात्र या औषधांच्या किंमतींवर कोणतेही नियंत्रण नसल्याचे एफडीएला दिसून आले आहे.
देशात जनऔषधी केंद्रे उपलब्ध करण्याचे निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. त्यासाठी प्रोत्साहनही दिले जात आहे. प्रत्यक्षात मात्र या केंद्रांना जागा मिळणे व तिथे जनऔषधांची विक्री होणे हेदेखील मोठे आव्हान आहे. जनऔषधी केंद्राच्या जागांवर अनेक ठिकाणी बॅण्डेड औषधेच विकली जातात. त्यामुळे या औषधांच्या विक्रीसाठी दिल्या जाणाऱ्या सवलती नेमक्या कशासाठी आहेत, असा प्रश्न सार्वजनिक आरोग्य अभ्यासक डॉ. व्ही. पी. नायर यांनी उपस्थित केला.
मुंबईमध्येही काही सार्वजनिक रुग्णालयामध्ये जनऔषधांच्या या दुकानांमध्ये बॅण्डेड औषधे घेण्याचा आग्रह केला जातो. काही पालिका रुग्णालयामध्ये या दुकानांसाठी जागा देण्यात आल्या असल्या, तरीही त्यासाठी निविदा राबवूनही प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते. गुणवत्तेच्या संदर्भात तक्रारीही अनेकदा आल्या आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.