नवी दिल्ली : खरा पंचनामा
एका गंभीर शारीरिक इजा प्रकरणात आरोपींना दिलेल्या दिलाशावर सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. खटल्याला २२ वर्षे लागल्याच्या कारणावरून आरोपींना तुरुंगवासापासून दिलासा देणे योग्य नसल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले.
या २००३ मधील प्रकरणात दोन्ही आरोपींना आत्मसमर्पण करण्याचे आदेश देण्यात आले असून, अलाहाबाद उच्च न्यायालयाला प्रकरणाची नव्याने सुनावणी घेण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकरणातील पीडित व्यक्तीच्या दोन्ही हातांच्या कार्यक्षमतेवर गंभीर परिणाम झाला असून, अद्याप तिच्यावर उपचार सुरू असल्याची बाबही न्यायालयाने अधोरेखित केली.
या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने दोन्ही आरोपींना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांना परिवीक्षेवर सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिक्षेचा निकाल लागूनही आरोपींना एक दिवससुद्धा तुरुंगात घालवावा लागला नाही. पीडित व्यक्तीच्या भावाने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर आले.
न्यायमूर्ती जे. बी. परडीवाला आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने प्रकरणाची सुनावणी करताना कनिष्ठ न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. आरोपींबाबत अवाजवी सहानुभूती दाखवण्यात आली आणि कायद्याचा व्यापक अर्थ लावून त्यांना दिलासा देण्यात आला, असे न्यायालयाने नमूद केले. या प्रक्रियेत पीडितेला न्याय मिळण्याच्या मुद्द्याकडे पुरेसे लक्ष दिले गेले नसल्याचेही खंडपीठाने म्हटले.
सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आरोपींच्या वर्तनाबाबतही निरीक्षण नोंदवले. खटला दीर्घकाळ चालणे ही निश्चितच त्रासदायक बाब असली, तरी या प्रकरणात आरोपी जामिनावर असतानाही गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे न्यायालयाने नमूद केले. आरोपींच्या प्रतिकूल चारित्र्य अहवालांचाही विचार करण्यात आला.
या अहवालांमध्ये त्यांचा अनेक गुन्हेगारी प्रकरणांशी संबंध असल्याचे नमूद होते.
अशा परिस्थितीतही उच्च न्यायालयाने आरोपींना दिलासा दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. या प्रकरणात सुरुवातीपासूनच पीडितेला न्याय देण्याच्या दृष्टीने गंभीर त्रुटी राहिल्याचे खंडपीठाने म्हटले. आता दोन्ही आरोपींना आत्मसमर्पण करावे लागणार असून, उच्च न्यायालयात प्रकरणाची नव्याने सुनावणी होणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
