Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कैद्यांमधील आत्महत्येचे सत्र रोखण्यासाठी गृहखात्याचा नवा उपक्रम; सिरियल किलरच्या मुलाखती घेण्याचा उपक्रम काय?

कैद्यांमधील आत्महत्येचे सत्र रोखण्यासाठी गृहखात्याचा नवा उपक्रम; सिरियल किलरच्या मुलाखती घेण्याचा उपक्रम काय?

मुंबई : खरा पंचनामा 

राज्यातील तुरुंगांमधील कुख्यात गुन्हेगार आणि 'सिरियल किलर्स'च्या मुलाखती घेण्याचा गृह विभागाचा बहुचर्चित 'रुद्रा' प्रकल्प नव्याने सुरू करण्यात येत आहे. वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने मार्च महिन्यात गुंडाळण्यात आलेल्या या प्रकल्पाचे मूळ उद्दिष्ट आता पूर्णपणे बदलण्यात आले असून, कैद्यांचे मानसिक आरोग्य, समुपदेशन, पुनर्वसन आणि त्यांच्यातील आत्महत्येचे प्रमाण रोखणे यावर आता भर दिला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांच्याकडे गृहखात्याची जबाबदारी आहे, त्यांनी या सुधारित उपक्रमाला नुकतीच मंजुरी दिली आहे. द इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे सविस्तर वृत्त दिले आहे.

गुन्हेगारांच्या मानसिकतेचा अभ्यास करून गुन्ह्यांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी 'रुद्रा' (Research Unit for Detection and Resolution of Anomalies in Criminals) हा प्रकल्प ७ मे २०२५ रोजी मंजूर करण्यात आला होता. १० वर्षांसाठी आखण्यात आलेल्या या १.८० कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे प्रमुखपद २३ वर्षीय अथर्व देशपांडे यांच्याकडे होते. मात्र, त्यांच्याविरोधात १० जणांच्या टीममधील सदस्याने तक्रार केल्यानंतर आणि सायन येथील लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांच्या अहवालानंतर गृह विभागाने मार्च महिन्यात हा प्रकल्प रद्द करत निधी व करार तातडीने मागे घेतला होता.

आता हा प्रकल्प गांधीनगर येथील 'राष्ट्रीय रक्षा युनिव्हर्सिटी'च्या सहकार्याने राबवला जाण्याची शक्यता आहे. या विद्यापीठाने यापूर्वी गुजरातच्या कारागृहांमध्ये अशाच प्रकारचा उपक्रम यशस्वीरीत्या राबवला आहे. आरआरयूच्या 'स्कूल ऑफ बिहेव्हिअरल सायन्सेस अँड फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन्स'च्या प्रमुख सल्लागार डॉ. एस. एल. वाया यांच्या देखरेखीखाली हा प्रकल्प चालवला जाईल.

गृह विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, "पूर्वीच्या प्रकल्पात केवळ सराईत गुन्हेगारांच्या मुलाखतींवर अधिक भर होता. परंतु, केवळ मुलाखती घेण्यापेक्षा तुरुंगात असलेल्या कैद्यांचे मानसिक खच्चीकरण होणार नाही, नैराश्यातून ते आत्महत्येसारखे पाऊल उचलणार नाहीत आणि ते पुन्हा गुन्हेगारी जगताकडे वळणार नाहीत, यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आम्हाला जाणवली."

कुटुंबीयांशी संवाद वाढवण्यावर भर
तुरुंगात गुन्ह्याच्या पश्चात्तापातून किंवा कुटुंबीयांनी पाठ फिरवल्यामुळे कैद्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ठाणे मध्यवर्ती कारागृहात पत्नी भेटायला येत नसल्याने एका कैद्याने आत्महत्या केली होती. या पार्श्वभूमीवर, कैद्यांचे कुटुंबीय त्यांना नियमित भेटतील आणि त्यांच्या मदतीने कैद्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल, यासाठी विशेष समुपदेशन तंत्रांचा वापर केला जाणार आहे. तुरुंग कर्मचाऱ्यांनाही अशा मानसिक तणावाखाली असलेल्या कैद्यांची लक्षणे वेळीच ओळखण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.

याशिवाय, किरकोळ अथवा क्षुल्लक गुन्ह्यांतून आत आलेला व्यक्ती सराईत गुन्हेगारांच्या संपर्कात येऊन मोठा गुन्हेगार बनू नये, यावरही हा उपक्रम लक्ष केंद्रित करेल.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.