मुंबई : खरा पंचनामा
अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर जुहू परिसरात १८ ऑक्टोबर रोजी झालेल्या गोळीबारप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन पिस्तुले आणि दहा जिवंत काडतुसे गुजरातमधील सुरत येथून जप्त केली. या प्रकरणात शस्त्रपुरवठा केल्याचा संशय असलेल्या प्रांजल थाकरन (२२) याला मध्य प्रदेशातील इंदूर येथून अटक करण्यात आली. या कारवाईमुळे प्रकरणातील अटक आरोपींची संख्या ११ झाली आहे.
सुरत रेल्वे स्थानकाजवळील रेल्वेमार्गालगतच्या झुडपांमध्ये ही शस्त्रे लपवून ठेवण्यात आल्याचा संशय होता. पोलिसांनी केलेल्या शोधमोहिमेत तुर्की बनावटीचे झिगाना पिस्तूल, देशी बनावटीचे पिस्तूल आणि दहा जिवंत काडतुसे सापडली. गोळीबारानंतर पसार होताना आरोपींनी ही शस्त्रे तेथे टाकल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपींपैकी एकाने दिलेल्या माहितीच्या आधारे शस्त्रे लपविलेल्या जागेचा शोध घेण्यात आला.
जप्त केलेली दोन्ही पिस्तुले आणि काडतुसे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.
जुहू येथील घटनास्थळावरून मिळालेल्या रिकाम्या काडतुसांशी जप्त शस्त्रांचा संबंध आहे का, हे तपासण्यासाठी शस्त्रवैज्ञानिक आणि आंतरप्रक्षेपक तपासणी केली जाणार आहे. या तपासणीनंतरच जप्त शस्त्रांचा गोळीबारातील वापर झाला होता का हे निश्चित होऊ शकेल.
या प्रकरणातील शस्त्रपुरवठ्याच्या साखळीचा तपास करताना प्रांजल थाकरन याचे नाव पुढे आले. हरियाणातील सोनीपतचा रहिवासी असलेला थाकरन अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. तो आपल्या भावाच्या उपचारांसाठी शनिवारी तो इंदूर येथे आला होता. त्यावेळी मुंबई आणि इंदूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याने गोळीबारासाठी वापरलेले देशी बनावटीचे पिस्तूल पुरविल्याचा संशय पोलिसांना आहे.
थाकरनचा या प्रकरणातील अन्य आरोपींशी आणि कथित सूत्रधारांशी संपर्क होता का, तसेच त्याने शस्त्रपुरवठ्याबरोबरच इतर कोणती मदत केली होती, याची चौकशी करण्यात येत आहे. त्याला मुंबईत आणून अधिक तपास करण्यासाठी इंदूर न्यायालयाने तीन दिवसांची संक्रमण कोठडी दिली. पोलिसांच्या तपासानुसार, गोळीबारानंतर आरोपी मुंबईतून सुरत येथे गेले आणि तेथून पुढील प्रवासाला निघण्यापूर्वी त्यांनी शस्त्रे रेल्वेमार्गालगत लपविली.
या प्रकरणात थेट गोळीबार करणाऱ्या आरोपींसह शस्त्रे मिळविणे, त्यांची वाहतूक करणे आणि आरोपींना मदत करणे यामध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून विविध राज्यांतून संशयीतांना अटक करण्यात येत आहे.
कथित सूत्रधार अनिल पंडित याचा शोधही सुरू आहे. त्याचा गुन्ह्यातील नेमका सहभाग आणि इतर आरोपींशी असलेले संबंध तपासले जात आहेत. तपासातील आरोपांची स्वतंत्र पडताळणी आणि जप्त शस्त्रांच्या न्यायवैद्यक अहवालानंतर या हल्ल्यामागील संपूर्ण कट स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
