Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'कुराश' प्रकरणी २५ जण अटकेत; १४ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश

'कुराश' प्रकरणी २५ जण अटकेत; १४ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश 



पुणे : खरा पंचनामा 

'कुराश' क्रीडा प्रकारात बनावट क्रीडा प्रमाणपत्रांद्वारे शासकीय नोकरी मिळवल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आतापर्यंत १४ पोलीस कर्मचाऱ्यांसह २५ जणांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलीस दलातील भरती प्रक्रियेत 'कुराश' या क्रीडा प्रकाराची बनावट प्रमाणपत्रे सादर करून क्रीडापटूंच्या आरक्षणाचा गैरफायदा घेऊन फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेने सखोल तपास सुरू केला. 'कुराश' संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यभरात एक हजार बनावट प्रमाणपत्र दिल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. 

बनावट प्रमाणपत्रांद्वारे किती जणांनी शासकीय नोकरी मिळविल्या, या दृष्टीने तपास करण्यात येत आहे. पुणे पोलीस दलातील भरती प्रक्रियेत 'कुराश' क्रीडा प्रकारातील बनावट प्रमाणपत्र सादर करून १९ जणांनी नोकरी मिळवल्याचे उघड झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी महाराष्ट्र राज्य कुराश संघटनेचे अध्यक्ष अंकुश नागर आणि शिवाजी साळुंके यांना गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली. या प्रकरणातील स्पर्धांमध्ये सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र त्यांनी दिले होते. 

या प्रकरणी नागर, साळुंके यांच्यासह त्रिवेणी पुनगावकर, धैर्यशील पुनगावकर, श्रृती पुनगावकर, शरद अंदुरे, प्रशांत साळुंखे, कुमार उपाध्याय, दत्तू व्यवहारे, चाँद शेख यांना अटक करण्यात आली आहे. बनावट प्रमाणपत्र सादर करून पोलीस भरती झाल्यानंतर पोलीस प्रशिक्षणास गेलेले प्रकाश सोडनर, समीर गायकवाड, दत्ता सदामते, रोहित गायकवाड, विशाल टेंगळे, रणजित मसलखांब, ऋतुराज पवार, अभिजीत किन्होळे यांनाही अटक करण्यात आली. प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी अद्याप निवड न झालेले पोलीस कर्मचारी प्रथमेश मोरे, ज्ञानेश्वर इंडोळे, चंद्रकांत शिंदे, मोहंमद जाफर फनीबंद यांच्यासह २५ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या सहा जणांचा शोध घेण्यात येत असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर एकाचा हदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे, अशी माहिती गुन्हे शाखेतील पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.