Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत उद्यापासून ५२ व्या कोल्हापूर परीक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धापोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची माहिती पहा व्हिडीओ

सांगलीत उद्यापासून ५२ व्या कोल्हापूर परीक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा
पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची माहिती 
पहा व्हिडीओ 

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

सांगली पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर शहीद अशोक कामटे क्रीडानगरीत ५२ व्या कोल्हापूर परीक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत एसपी तुषार दोशी यांनी माहिती दिली. या स्पर्धा २५ ऑक्टोबर २०२६ ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सकाळी ६:३० ते रात्री १०:०० वाजेपर्यंत पार पडणार आहेत. या स्पर्धेचा शुभंकर (Mascot) 'सेनापती (वाघ)' असा ठेवण्यात आला आहे.


कोल्हापूर परीक्षेत्रातील सांगली, कोल्हापूर, सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण, सातारा आणि पुणे ग्रामीण या पोलीस दलांमधील ६६४ पुरुष आणि २३६ महिला पोलीस अधिकारी व अंमलदार असे एकूण ९०० खेळाडू यामध्ये सहभाग घेणार आहेत. या क्रीडा स्पर्धेत ॲथलेटिक्स, फुटबॉल, हॉकी, हँडबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, खो-खो, कबड्डी, वेटलिफ्टिंग, वुशू, पॉवरलिफ्टिंग, बॉडी बिल्डिंग, कुस्ती, ज्युडो, तायक्वांदो, जलतरण, बॉक्सिंग आणि क्रॉसकंट्री असे एकूण १९ खेळ खेळवले जाणार आहेत. हे सर्व खेळ सांगली पोलीस मुख्यालय, सांगली क्रीडा संकुल, दिग्विजय व्यायाम संस्था आणि इचलकरंजी येथील शंकरराव पुजारी जलतरण तलाव येथे आयोजित करण्यात आले असून स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्ह्यातील १५० उत्कृष्ट पंचांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या स्पर्धेत विशेष आकर्षण म्हणून ॲथलेटिक्स प्रकारातील उत्कृष्ट पुरुष खेळाडूला होंडा कंपनीची पॅशन मोटरसायकल आणि उत्कृष्ट महिला खेळाडूला एथर कंपनीची इलेक्ट्रिक बाईक बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. स्पर्धेचा भव्य पारितोषिक वितरण व समारोप समारंभ २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजता पार पडणार आहे.

या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रीमती तेजस्विनी सावंत उपस्थित राहणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्षपद कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. रंजन कुमार शर्मा भूषवणार आहेत. तसेच सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक निलोत्पल, सातारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक  संदीपसिंग गिल्ल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.