अकोला : खरा पंचनामा
दिवाळीमध्ये भेसळयुक्त तेलाचा मोठा धोका असतो. या पार्श्वभूमीवर अन्न पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा विभागाने अकोल्यातील मे. गलानी अॅग्रो प्रा. लि.
या आस्थापनेवर मोठी कारवाई केली. तपासणीदरम्यान मोहरी तेल आणि तीळ तेलामध्ये भेसळ असल्याचा संशय आल्याने तब्बल १,११० किलो तेलाचा साठा जप्त केला.
विविध नियमांचे उल्लंघन आढळल्याने संबंधित आस्थापनेचा परवाना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा विभागाच्या पथकाने गलानी अॅग्रो प्रा. लि. या आस्थापनेची तपासणी केली. यावेळी विश्लेषणासाठी प्रीमियम मोहरी तेल, प्रीमियम तीळ तेल, सुटे मोहरी तेल आणि सुटे तीळ यांच्या नमुन्यांचे विश्लेषण करण्यात येणार असून, त्यानंतर तेलाच्या गुणवत्तेबाबत पुढील निष्कर्ष स्पष्ट होतील. तपासणीदरम्यान भेसळीचा संशय आल्याने विभागाने आस्थापनेतील तेलाचा शिल्लक साठा जप्त केला. यामध्ये १ लाख ४५ हजार ८०० रुपये किमतीचे ५४० किलो मोहरी तेल, तर १ लाख ८२ हजार ४०० रुपये किमतीचे ५७० किलो तीळ तेलाचा समावेश आहे. अशा प्रकारे एकूण १,११० किलो तेलाचा साठा जप्त केला.
तपासणीदरम्यान आस्थापनेत अन्न सुरक्षा मानकांशी संबंधित अनेक त्रुटी आढळून आल्या. आस्थापनेकडे तांत्रिक व्यक्ती नसणे, अन्न सुरक्षा व्यवस्थापन प्रणालीचाआराखडा नसणे, पोषणमूल्यांची माहिती व अन्न पदार्थांच्या विश्लेषण अहवालांचे अभिलेख उपलब्ध नसणे, साठा व्यवस्थापन आणि साफसफाईचे अभिलेख नसणे, अशा त्रुटी निदर्शनास आल्या. कच्च्या अन्नपदार्थांचे अभिलेख व स्टॉक रजिस्टर उपलब्ध नव्हते. कच्चे आणि तयार अन्नपदार्थ पॅलेटवर न ठेवता थेट जमिनीवर ठेवण्यात आले होते. खिडक्यांना बारीक जाळ्यांची व्यवस्था नसल्याचेही आढळले. या त्रुटी अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत असलेल्या शेड्यूल ४ मधील विविध तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या असल्याने आस्थापनेचा परवाना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला.
ही कारवाई आयुक्त तुकाराम मुंढे आणि अमरावतीचे सहआयुक्त सचिन केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्याचे सहाय्यक आयुक्त (अन्न) देवानंद वीर यांच्या समवेत अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बोरचाटे यांनी केली. या कारवाईमुळे व्यापारी, उद्योजकांमध्ये खळबळ उडाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
