सांगली बुकीजच्या ‘पेज रीडिंग मीटर’ उपक्रमाची यशस्वी घोडदौड; एक लाख पानांचे उद्दिष्ट पार!
घटस्थापनेच्या दिवशीच १ लाख पानांचे वाचन; ९०० हून अधिक पुस्तकांचे वाचन, ११० वाचकांचा सक्रिय सहभाग
सांगली : खरा पंचनामा
वाचनसंस्कृतीला चालना देण्यासाठी सांगली बुकीजच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘पेज रीडिंग मीटर २०२६ – सीझन २’ या उपक्रमाने महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. १५ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सामूहिकरीत्या एक लाख पानांचे वाचन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. घटस्थापनेच्या दिवशीच हे उद्दिष्ट पार करत वाचकांनी एकूण १ लाख ३ हजार ३०० पानांचे वाचन पूर्ण केले आहे. या कालावधीत ९०० हून अधिक पुस्तकांचे वाचन झाले असून, सुमारे ११० वाचकांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे.
या उपक्रमासाठी एकूण १७० जणांनी नोंदणी केली होती. विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध वयोगटांतील वाचकांनी आपापल्या दैनंदिन जीवनातून वाचनासाठी वेळ काढत या सामूहिक उद्दिष्टपूर्तीत योगदान दिले. सांगली बुकीज चे संस्थापक व समन्वयक सुदर्शन चोरगे यांनी घटस्थापनेच्या दिवशी हे उद्दिष्ट पूर्ण झाल्याची माहिती दिली.
उपक्रमांतर्गत सर्वाधिक वाचन करणाऱ्या पहिल्या दहा वाचकांमध्ये विनायक दाणेकरी, संभाजी दाणेकरी, इंद्रायणी महाजन, श्रेया मासाळ, डॉ. माधवी ठाणेदार, सुहास गवळी, शुभदा कुलकर्णी, वैशाली गायकवाड, स्वाती ढाके आणि पूनम रसाळ यांनी स्थान मिळवले. विशेष म्हणजे, किमान ३० वाचकांनी एक हजार पानांच्या वाचनाचा टप्पाही ओलांडला आहे.
केवळ वाचलेल्या पानांची संख्या वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश नसून, नियमित वाचनाची सवय लावणे, पुस्तकांविषयी आवड निर्माण करणे, मोबाईलच्या अतिवापरापासून काही काळ दूर राहणे आणि समाजात वाचनाची चळवळ अधिक व्यापक करणे, ही या उपक्रमामागील प्रमुख भूमिका आहे. मागील वर्षी ५० हजार पानांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यंदा हे उद्दिष्ट दुप्पट करून एक लाख पानांचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते. वाचकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे निर्धारित मुदतीपूर्वीच हे लक्ष्य पार झाले.
या यशाबद्दल सांगली बुकीजच्या वतीने सर्व सहभागी वाचकांचे अभिनंदन करण्यात आले. वाचनाची नोंद १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन करतानाच, उपक्रमाच्या निमित्ताने मनामनांत रुजलेले वाचनप्रेम आयुष्यभर जपावे आणि आपल्या परिचितांमध्येही वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
एक लाख पानांच्या उद्दिष्टपूर्तीपलीकडे जाऊन सांगलीत वाचनाची समृद्ध संस्कृती रुजवण्याचा संकल्प या उपक्रमाने अधिक बळकट केला आहे. केवळ पहिल्या दहा वाचकांचे नव्हे, तर या वाचनपालखीत सहभागी झालेल्या प्रत्येक वाचकाचे योगदान महत्त्वाचे असून, सामूहिक प्रयत्नांतून वाचन चळवळीला नवी झळाळी मिळत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.