Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भाजप-शिवसेनेतील वाद चिघळला! 'दोस्तीत कुस्ती' सुरू असतानाच कदमांचा बन यांना टोला; फटकारतं म्हणाले, 'आपले सिनियर...'

भाजप-शिवसेनेतील वाद चिघळला! 'दोस्तीत कुस्ती' सुरू असतानाच कदमांचा बन यांना टोला; फटकारतं म्हणाले, 'आपले सिनियर...'

मुंबई : खरा पंचनामा 

विधानपरिषद निवडणुकीतील पराभवानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये सुरू झालेला आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा अद्यापही कायम आहे. काल सुरू झालेली चिखलफेक थांबण्याचे नाव घेत नसून, भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांच्या टीकेला शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. 'तुझी लायकी किती, तू बोलतो किती!' अशा शब्दांत त्यांनी बन यांना फटकारले होते.

त्यानंतर नीलेश राणे यांची लायकी काढणाऱ्या बन यांनी नारायण राणे यांच्यासोबतचा फोटो शेअर करत पलटवार केला. यामुळे भाजप आणि शिवसेनेतील नेत्यांमधील शाब्दिक संघर्ष अधिकच तीव्र झाला असून, महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, या वादावरून शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री योगेश कदम यांनी नवनाथ बन यांना फटकारत सबुरीचा सल्ला दिला आहे.

विधानपरिषद निवडणुकीतील पराभवानंतर भाजपकडून शिवसेनेतील नेत्यांवर पराभवाचे खापर फोडण्यात आले. माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधी भूमिकेवर बोट ठेवत भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी टीका केली होती. तसेच, या नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेला शिवसेनेची संमती होती का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट उत्तर द्यावे, अशी मागणी बन यांनी केली होती.

याच मागणीवरून महायुतीत मिठाचा खडा पडला असून, भाजप आणि शिवसेनेतील वादाला सुरुवात झाली आहे. एका प्रवक्त्याने थेट पक्षाच्या प्रमुखांना जाब विचारल्याने शिवसेनेत संतापाची लाट उसळली. यावरूनच नीलेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत पत्रकार परिषदेत नवनाथ बन यांना चांगलेच झापले होते.

'एकनाथ शिंदे यांच्यावर बोलण्याचा अधिकार नवनाथ बन यांना नाही. आम्ही कधीही भाजपच्या नेत्याला कोणत्याही निवडणुकीतील पराभवासाठी जबाबदार धरलेले नाही. आमचे नेते एकनाथ शिंदे यांची मूक संमती आहे का, असा सवाल विचारणारा तू कोण?' अशा शब्दांत नीलेश राणे यांनी बन यांच्यावर निशाणा साधला होता. 'नवनाथ बन माझा मित्रबित्र नाही, तो माझा ज्युनिअर आहे. मी २००९ साली खासदार झालो, तेव्हा तो चड्डीत होता. मी ऐऱ्यागैऱ्यांना मित्र बनवत नसतो,' असे म्हणत त्यांनी बन यांच्यावर टीका केली होती. सोशल मीडियावरूनही त्यांनी बन यांना लक्ष्य केले होते.

नीलेश राणे यांच्या टीकेनंतर नवनाथ बन यांनीही प्रत्युत्तर दिले. त्यांनी नीलेश राणे यांचे वडील आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोखाली 'ज्युनिअर नवनाथ बन विथ सिनिअर राणेसाहेब' असे कॅप्शन दिले. 'ज्युनिअर' या शब्दाचा वापर करत बन यांनी नीलेश राणे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिल्याचे दिसून आले. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील हा वाद आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.