शिक्षक-पदवीधर निवडणुकीत भाजपला धक्का; Exit पोलचा धक्कादायक अंदाज
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांसाठी मतदान पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. पाच जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
दरम्यान, 'साम टीव्ही'च्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला चार, तर महाविकास आघाडीतील काँग्रेसला एका जागेवर यश मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याचा दावा आहे. मात्र, हा केवळ अंदाज असून अधिकृत निकाल २७ ऑक्टोबरला जाहीर होणार आहे.
एक्झिट पोलमध्ये कोणत्या पक्षाला किती जागांचा अंदाज ?
भाजप : २ जागा
शिवसेना (एकनाथ शिंदे गट) समर्थित उमेदवार : १ जागा
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : १ जागा
काँग्रेस : १ जागा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) : ० जागा
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) : ० जागा
पुणे पदवीधर : स्मिता जाधव की हर्षदा देशमुख-जाधव ?
पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या डॉ. स्मिता जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांच्यात प्रमुख लढत आहे. 'साम टीव्ही'च्या एक्झिट पोलमध्ये डॉ. स्मिता जाधव यांचे पारडे जड असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाचे सुनील मोदी यांच्यासह अन्य उमेदवारही रिंगणात होते. त्यामुळे अंतिम निकालात मतविभाजनाचा किती परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पुणे शिक्षक : सचिन सानप यांच्या विजयाचा अंदाज?
पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर, शिवसेना (शिंदे गट) समर्थित अपक्ष सचिन सानप आणि माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्यात लढत झाली.
छत्रपती संभाजीनगर पदवीधर : सतीश चव्हाण आघाडीवर?
छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे सतीश चव्हाण, डॉ. प्रतापसिंह पाटील आणि दिलीप घुगे यांच्यासह एकूण ४१ उमेदवार रिंगणात होते.
दिलेल्या एक्झिट पोलच्या माहितीनुसार, सतीश चव्हाण यांचे पारडे जड असल्याचा अंदाज आहे. या मतदारसंघातील अंतिम निकालासाठी २७ ऑक्टोबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधर तसेच पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान झाले. या पाच जागांसाठी एकूण १८२ उमेदवार रिंगणात होते. मतमोजणी २७ऑक्टोबर रोजी होणार असून त्यानंतरच कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, हे स्पष्ट होईल.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.