नवी दिल्ली : खरा पंचनामा
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) वरिष्ठ नेत्यांनी रविवारी रात्री उशिरा दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ हे प्रमुख नेते उपस्थित होते.
या बैठकीत राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती, आगामी रणनीती आणि पक्षांतर्गत विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. मात्र, या सर्व घडामोडींमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्या सुनेत्रा पवार या या बैठकीला उपस्थित नव्हत्या. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच सुनेत्रा पवार यांनी अमित शाह यांची स्वतंत्रपणे भेट घेतली होती. त्यानंतर आता पक्षाच्या इतर बड्या नेत्यांनी सुनेत्रा पवारांशिवाय अमित शाह यांची घेतलेली ही भेट राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेचा विषय ठरली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या ६ ज्येष्ठ नेत्यांनी अमित शाह यांच्याकडे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला विरोध दर्शवला आहे. त्याशिवाय, अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्याकडील अर्थ खाते सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. हे अर्थ खातं पुन्हा राष्ट्रवादीला देण्यात यावे अशी मागणी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद असून पक्षात दोन गट पडल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहेत. अशा पार्श्वभूमीवर ऐन रात्री उशिरा झालेल्या या गुप्त बैठकीमुळे तर्क-वितर्वांना उधाण आले आहे. ही भेट केवळ राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चेसाठी होती की पक्षांतर्गत समीकरणांमध्ये काही मोठे बदल घडणार आहेत, याबद्दल आता राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने हक्काची पुणे पदवीधर जागा भाजपला सोडली. त्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याशिवाय, निकालानंतर प्रफुल पटेल यांनी पक्षाने आत्मचिंतन करण्याची आवश्यकता असून लोकांमध्ये जायला हवे असे थेट जाहीरपणे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले. तर, प्रवक्तत्यांच्या नियुक्तीवरून भुजबळ यांनीदेखील आपल्याला माध्यमांमधून नियुक्तींची माहिती मिळत असल्याचे सांगितले होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
