Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

‘क्रिप्टोकरन्सी’ फसवणूक; आलिशान गाडी, 2 दुचाकी, रोकड जप्त

‘क्रिप्टोकरन्सी’ फसवणूक; आलिशान गाडी, 2 दुचाकी, रोकड जप्त




सांगली : खरा पंचनामा

क्रिप्टोकरन्सीच्या आमिषाने ६१ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी मिरजेतील दामप्त्यांसह तिघांवर मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. रविवारी सकाळी संशयितांच्या घरावर छापे टाकण्यात आले. त्यामध्ये एक आलिशान गाडी, 2 महागड्या दुचाकी, सुमारे 2 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

सादिक यासीन कोचरगी (रा. शहापुर, इचलकरंजी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांच्यासह इचलकरंजीतील चौघांची तब्बल ६१ लाखांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी फसवणूकीसह महाराष्ट्र ठेवीदारांच्या  अधिनियम १९९९ च्या कलम तीन नुसार गुन्हा नोंद केला. फिर्यादीनुसार डॉ. इब्राहीम महदसाब इनामदार त्याची पत्नी जस्मीन इब्राहीम इनामदार, अब्दुल महदसाब इनामदार (तिघे रा. छलवादे गल्ली, मिरज) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कोचरगी हे इचरकरंजीतील आर. के. नगर येथे राहतात. त्यांचा यंत्रमागाचा व्यवसाय आहे. त्यांच्या घराजवळ राहणारे लतीफ मुल्ला आणि त्यांच्या मुलगा ओसामा यांची ओळख होती. मुल्ला हे इचरकरंजी येथे हॉटेल अल बॅक सुरू करणार होते. त्यासाठी संशयित जस्मीन इनामदार हिच्याकडून हॉटेलची शाखा मिळणार होती. त्याचे काम सुरू असताना फिर्यादी कोचरगी हे नियमीत जात होते. जानेवारी २०२२ मध्ये संशयित जस्मीन इनामदार, डॉ. इब्राहीम इनामदार आणि अब्दुल इनामदार यांच्याशी मुल्ला यांनी ओळख करून दिली. त्यावेळी संशयितांनी कोचरगी यांना क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून तीन महिन्यांत दुप्पट रक्कम देण्याचे सांगितले. त्यांच्यावर विश्‍वास ठेवून फिर्यादी कोचरगी यांनी ५ जानेवारी रोजी इनामदार यांच्या मिरजेतील घरी एक लाख रूपये दिले. त्यावेळी कोचरगी यांच्यासमवेत नईम जंगले, अबुल मुजावर होते. त्यावेळी गुंतवणूक रक्कमेस हमी म्हणून प्रॉमिसरी नोट करून दिली.
त्यानंतर फिर्यादी यांनी १६ जानेवारी रोजी आणखी अकरा लाखांच्या रक्कमे गुंतवणूक केली. संशयितांच्या सांगण्याप्रमाणे घरातील चार मोबाईल, मामा झाकीर हुसैन नगारजी (रा. गोकाक) यांच्या घरातील पाच मोबाईल व मित्र सैफुल्ला शेख, साहिल मुजावर यांच्या मोबाईलवर ११ ट्रस्ट वॉलेटवरून आयडी जनरेट करून घेतले. त्यानंतर २२ फेब्रुवारी रोजी कोल्हापूरमधील एका तारांकीत हॉटेलमध्ये क्रिप्टोकरन्सीचा सेमीनार झाला. 

त्यावेळी फिर्याद व त्यांचे मित्र नईम जंगले, संभाजी जाधव, नवाज मुजावर गेले होते. त्यावेळी संशयितांनी याबाबतची माहिती देत गुंतवणूक केल्यास भविष्यात काय फायदा होईल हे सांगितले. त्यानंतर गुंतवणूकीसाठी मिरजेतील घरात येण्याचे आवाहन संशयितांनी केले.
फिर्यादी यांनी गुंतवलेले १२ लाख रूपयांचा परताना तीन महिन्यानंतर मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी संशयितांना याबाबत विचारणा केली. त्यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावेळी फसवणूक झाल्याचे समोर आले. याचप्रमाणे फिर्यादी यांच्यासह नईम जंगले यांचे १३ लाख, बंदेनवाज मुजावर यांचे १४ लाख, संभाजी जाधव यांचे २२ अशी एकत्रित ६१ लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले. त्यानंतर संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर रविवारी पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, अंमलदार अमोल लोहार, विनोद कदम, शुंभागी पाटील यांच्या पथकाने मिरजेतील घरावर छापा टाकला. त्यावेळी आलिशान गाडी, 2 दुचाकी, रोकड जप्त करण्यात आली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.