उर्से टोलनाक्यावर 47 लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त
पुणे : खरा पंचनामा
ऊर्से टोलनाक्यावर कंटेनरमध्ये चक्क दारूचे कोठारच मिळाले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तळेगाव कार्यालयाने दारूची तस्करी हाणून पाडली. नऊशे बॉक्स त्यांनी पकडले. ४७ लाख ५२ हजार रुपयांची ही चोरीची गोवा बनावटीची दारू आहे. तिची वाहतूक करणारा १५ लाखांचा कंटेनर सुद्धा (एमएच ०१ एन ८००७) जप्त करण्यात आला आहे.
गोवा राज्यात निर्मित व तेथेच विक्रीसाठी परवानगी असलेली दारू ही शेजारील इतर ज्यांच्या तुलनेत खूप स्वस्त आहे. म्हणून तिची देशभरात तस्करी केली जाते. त्यामुळे राज्यांचा महसूल बुडतो. अशा मद्य तस्करांविरुद्ध सबंधित राज्यांचे उत्पादन शुल्क विभाग कारवाई करीत असतात. त्याबाबत माहिती तळेगावच्या एक्साईज कार्यालयाला मिळाल्याने त्यांनी ऊर्से टोलनाक्यावर शुक्रवारी सकाळपासून सापळा लावला होता.
त्यांना माहिती मिळालेला कंटेनर अडवून त्याची तपासणी केली असता त्यात दारुचे घबाड सापडले. राज्य उत्पादन शुल्कचे पुणे विभाग अधिक्षक चरणसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव दाभाडे कार्यालयाचे निरीक्षक संजय सराफ, दुय्यम निरीक्षक डी. बी. सुपे तसेच राहूल जौंजाळ, तात्याबा शिंदे, रणजित चव्हाण, हनुमंत राऊत आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
चालक गामित सोमवेलभाई सिंगाभाई (वय २५, रा. गुजरात ) आणि क्लिनर मोहन दिनराम खथात (वय ३४, रा. राज्यस्थान) यांना राज्य दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे.
गुजरात राज्यात दारुबंदी असूनही तेथे ती चोरून विकली जात आहे. त्यातही कमी कर असलेल्या गोव्यातून तिची तस्करी तिकडे होत आहे, असे सांगण्यात आले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.