Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बँक मॅनेजरचा गळा चिरून खून

बँक मॅनेजरचा गळा चिरून खूनबुलढाणा : खरा पंचनामा

लोणार तालुक्यातील हिरडव येथील स्टेट बँकेच्या मॅनेजरचा चाकूने गळा चिरुन खून करण्यात आला. खून केल्यानंतर मारेकऱ्यांनी मृतदेह उसाच्या शेतात फेकून दिला. ही घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. जिल्ह्यात नुकत्याच आलेल्या बँक मॅनेजरचा खून झाल्याने घटनेचे गूढ वाढले आहे.

उत्कर्ष पाटील असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पाटील मुंबईचे रहिवासी आहेत. तीन आठवड्यापूर्वी त्यांची बुलढाणा जिल्ह्यातील हिरडव शाखेत तात्पुरती नियुक्ती झाली होती. २०१४ मध्ये एसबीआयच्या सेवेत रूजू झालेल्या उत्कर्ष पाटील यांची आठ वर्षांच्या सेवेनंतर परिविक्षाधीन शाखाधिकारी म्हणून बुलढाणा येथे कर्ज विभागात बदली झाली होती. 

त्यानंतर आपला परिवार मुंबईत असल्याचे कारण दाखवत त्यांनी सेवेचा राजीनामा सादर केला होता. त्यामुळे पाटील यांना राजीनामा मंजूर होईपर्यंतच्या अवधी दरम्यान जिल्ह्यातील जानेफळ, हिवरा आश्रम, हिरडव या शाखांवर तात्पुरती नियुक्ती देण्यात आली होती.

गेल्या तीन आठवड्यापासून ते हिरडव (ता. लोणार ) शाखेवर कार्यरत होते. रविवारच्या सायंकाळी लोणार - मेहकर मार्गावरील सारंगपूर फाट्यावरील उसाच्या शेतात पाटील यांचा मृतदेह आढळून आला. चाकूने त्यांचा गळा चिरून खून केल्याचे आढळले. त्यांच्या मृतदेहाजवळ चाकू ठेवून अज्ञात मारेकरी पसार झाल्याने खूनाचे गूढ वाढले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.