Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कवलापूर विमानतळ विक्रीची प्रक्रिया थांबवा!

कवलापूर विमानतळ विक्रीची प्रक्रिया थांबवा!सांगली : खरा पंचनामा

मिरज तालुक्यातील कवलापूर येथील विमानतळाच्या १६० एकर जागेच्या विक्रीची प्रक्रिया पूर्णपणे थांबवा. या जागेवर विमानतळ व्हावे, त्यासाठी पुन्हा सर्वेक्षण करा. धावपट्टीसाठी नेमकी किती जागा कमी पडते, हे सांगा, अशी मागणी विमानतळ बचाव कृती समितीचे नेते, माजी आमदार नितीन शिंदे आणि सतीश साखळकर यांनी केली आहे.

शिंदे, साखळकर यांनी कवलापूर विमानतळ जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. विमानतळाची मूळ जागा, धावपट्टीसाठीचे आरक्षण, तेथील परिस्थिती याची पूर्ण माहिती घेतली. या ठिकाणी विमानतळ होण्यात नेमक्या अडचणी काय आहे, याचा आता सोक्षमोक्ष झालाच पाहिजे, असा निर्धार त्यांनी पाहणीवेळी केला. 

ही जागा विमानतळासाठी रहावी यासाठी विमान प्राधीकरणाकडे धडक दिली जाणार आहेच, मात्र त्याआधी औद्योगिक विकास महामंडळाने आता या जागेच्या विक्रीसाठीचा खटाटोप तातडीने थांबवावा, अशी मागणी त्यांनी केली.

माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले, ‘‘कवलापूरला विमानतळच झाले पाहिजे, यात आता दुमत नाही. कुणी काही म्हटले तरी जागेचा व्यवहार होऊ देणार नाही. ही अत्यंत मोक्याची आणि जिल्ह्याच्या विकासात महत्वाची जागा आहे. आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली, एवढी मोठी जागा पुन्हा मिळणे अशक्य आहे. त्यामुळे औद्योगिक विकास महामंडळाने घाईघाईत व्यवहार करण्यासाठी घातलेला घाट रद्द करावा. अन्यथा, त्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला जाईल.’’

सतीश साखळकर म्हणाले, ‘‘विमानतळ प्राधीकरणाकडून ही जागा औद्योगिक विकास महामंडळाकडे वर्ग करण्याची संपूर्ण प्रक्रिया ही अंधारात झालेली आहे. त्याबाबत काहीही स्पष्टता नाही. विमानतळ होऊच शकत नाही, असे म्हणताना केवळ जागा अपुरी आहे, असे कारण असेल तर मग आवश्‍यक अतिरिक्त जागा खरेदीत अडचणी काय आहेत? राष्ट्रीय महामार्ग बनवताना सगळी जागा सरकारची आहे का? विमानतळ प्राधीकरण तर गरजेनुसार काही पट किंमत देऊन जागा खरेदी करत असते. त्यामुळे गरज पडली तर गरजेनुसार जागा खरेदी शक्य आहे. त्याबाबत आधी सर्वेक्षण करावे. धावपट्टी किती उपलब्ध आहे, हे पहावे. ते जनतेसमोर मांडावे.’’ असेही साखळकर यावेळी म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.