सांगलीतील सैफ पटेलची टोळी दोन वर्षासाठी हद्दपार
सांगली : खरा पंचनामा
सांगली शहरात गेल्या सहा वर्षापासून दहशत माजविणाऱ्या सैफ पटेल टोळीला सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली यांनी केली. टोळीतील नऊ जणांवर विविध प्रकारचे गुन्हे सांगली शहर पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
टोळीप्रमुख सैफ मेहमुद पटेल (वय २२ वर्षे, रा. खामकर गल्ली, खणभाग सांगली) रोहन सुखदेव हेगडे (वय २०, रा. सिटी हायस्कुल मागे, सागली), समीर रमजान नदाफ, (वय ३४, रा. नळभाग, सांगली), सलीम खुदबुद्दीन पठाण (वय ३४, रा. गारपीर चौक, दुसरी गल्ली, सांगली), जुबेर मुस्ताक मुजावर (वय २६, रा. पाकीजा मशिदजवळ सांगली), मोबीन खुदबुद्दीन मुजावर (वय २६, रा. पाकीजा मशिदजवळ, सांगली) नयाज रहीम मुल्ला (वय २५, रा. पाकीजा मशिदमागे सांगली), अतुल अनिल गुरव (वय २१) आणि स्वप्निल अनिल गुरव ( वय २३, रा. दोघेही पाकीजा मशीद समोर १०० फुटी सांगली) अशी हद्दपार केलेल्यांची नावे आहेत.
या टोळीची २०१७ ते २०२२ या कालावधीत सांगली शहरात दहशत होती. टोळीतील सदस्यांविरुध्द दुखापत करण्याची पुर्वतयारी करुन चोरी करणे, मृत्यूस कारणीभूत होणे, जबरी चोरी करण्यासाठी गंभीर दुखापत करणे, घरफोडी करणे, मोबाईल चोरी, वाहनांची तोडफोड करुन पेटवणे, घातक शस्त्र बाळगणे, अमली पदार्थाचे (गांजा) सेवन करणे, बेकायदा जमाव जमवून दुखापत करणे असे विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अभिजीत देशमुख यांनी या टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधिक्षकांकडे पाठविला होता. या प्रस्तावासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांनी टोळीविरुध्द दाखल असलेल्या गुन्हयांचा विचार करुन चौकशी अहवाल पोलीस अधिक्षकांना सादर केला होता.
त्यानंतर या टोळीला सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षे कालावधीकरिता तडीपार करण्याचा आदेश पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिला. या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस फौजदार सिध्दाप्पा रुपनर, पोलीस कर्मचारी संजय पाटील, दिपक गट्टे, झाकीरहुसेन काझी, अभिजीत माळकर यांनी सहभाग घेतला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.








