कवलापूर विमानतळ जागा विक्रीची प्रक्रिया रद्द
सांगली : खरा पंचनामा
व्यापक लोकहितासाठी सत्याच्या मार्गाने, निष्ठेने लढा उभा केला तर त्यात यश येते, याचा प्रत्यय कवलापूर येथील विमानतळाची जागा वाचवण्याच्या लढ्यात आला आहे. ही जागा मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या प्रॉफिट मेकिंग कंपन्यांना झटका बसला आहे. या कंपन्यांना ही जागा विकण्याची संपूर्ण प्रक्रिया औद्योगिक विकास महामंडळाने रद्द केली आहे.
जागा खरेदीच्या स्पर्धेतील श्री श्रीष्ठा कंपनी, सांगली स्पाईस बोर्ड आणि उद्योजक प्रवीण लुंकड यांचे प्रस्ताव फेटाळण्यात आले आहेत. त्यामुळे ‘इथे विमानतळच झाले पाहिजे’, या आग्रही लढ्याला पहिले मोठे यश मिळाले आहे.
जागा वाचवण्यासाठी लोकलढा उभा राहिला. कवलापूर येथे दोन कृती समिती स्थापन झाल्या आणि सांगलीत पक्षविरहीत विमानतळ बचाव कृती समितीने ताकदीने लढ्याचे नेतृत्व हाती घेतले. विमानतळ जागेच्या कागदपत्रांपासून ते तांत्रिक बाबींपर्यंत प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा सुरु केला. धावपट्टीचे आरक्षण कायम आहे, ही अत्यंत महत्वाची सकारात्मक बाब समोर आली. येथे विमानतळ होण्यासाठी जागा कमी पडते हे वास्तव आहे, मात्र जागा खरेदी अशक्य नाही, हा मुद्दा पुराव्यांनिशी समोर आणला गेला.
केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे सगळा विषय मांडला गेला. आधी या विषयाच्या विरोधात असलेले खासदार संजय पाटील यांनी विमानतळाला पाठींबा दिला आहे. या जागेसाठी धडपड करणाऱ्या कृष्णा व्हॅली चेंबरने या जागी औद्योगिक विकासापेक्षा विमानतळ व्हावे, अशी भूमिका घेतली आहे. या सर्व हालचालींची माहिती येथील उद्योग भवनकडून महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे दिली जात होती. त्याचा परिणाम ‘प्रॉफिट मेकिंग कंपन्या’ना असलेला विरोध समोर आला. आता खासगी कंपन्यांना जागा विक्रीची संपूर्ण प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.
विमानतळ बचाव कृती समिती निमंत्रक, पृथ्वीराज पवार म्हणाले, ‘‘दोन-चार लोक जिल्ह्याचे मालक नाहीत. कुणी उद्योजक, व्यापारी व्हायचे, हे ठरवण्याचा त्यांना अधिकार नाही. शासकीय जागा लाटायचा बाजार आपण एकजुटीने हाणून पाडला आहे. औद्योगिक विकास महामंडळाने घेतलेला निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. जिल्ह्यातील प्रत्येक माणसाची भावना इथे विमानतळ व्हावे, अशी आहे. त्यासाठी कसोसीने प्रयत्न करू.’’
कृती समितीचे नेते सतीश साखळकर म्हणाले, ‘‘सांगली जिल्ह्यात विमानतळ व्हावे, हे स्वप्न लांबपल्ल्याचे आहे. त्यासाठी मोठी लढाई करावी लागेल. त्यातील पहिली लढाई आपण जिंकलो आहोत. ही जागा वाचवण्यात आपण यशस्वी झालो आहोत. औद्योगिक विकास महामंडळाने आता कोणत्याही हालचाली करू नयेत. उद्योग विकासासाठी विमानतळ ही मुख्य गरज आहे, हे लक्षात घ्यावे.’
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.