Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

देवेन भारतींच्या नियुक्तीवरून मुख्यमंत्री नाराज!

देवेन भारतींच्या नियुक्तीवरून मुख्यमंत्री नाराज! मुंबई : खरा पंचनामा 

विधानपरिषदेच्या उमेदवारीच्या घोषणेवरून आणि मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी नव्याने नियुक्ती करण्यात आलेल्या देवेन भारती यांच्या नियुक्तीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाला विचारात न घेताच भाजपने विधानपरिषदचे उमेदवार जाहीर केल्याचे पडसाद मंत्रीमंडळ बैठकीत उमटल्याचे समजते. 

विधानपरिषदचे उमेदवार भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केल्याने शिंदे गटाने उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. दि. ३० जानेवारीला शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी भाजपकडून तीन नावांची घोषणा करण्यात आली. सध्या राज्यात सत्तेत भाजप आणि शिंदे गट आहे. पण जाहीर झालेल्या उमेदवारांमध्ये सगळी नावे ही भाजपचीच आहेत. त्यामुळे याबाबत शिंदे गटात नाराजी पसरल्याची चर्चा आहे. 

यावरून शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी देवेंद्र फडणवीसांकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते. दादा भुसेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना थेट याबाबतचा सवाल विचारला. त्यात त्यांनी कोकण आणि नाशिकची जागा ही शिंदे गटासाठी ठरलेली असताना चंद्रशेखर बावनकुळेंनी असे परस्पर उमेदवार जाहीर करणे हे योग्य नसल्याचे दादा भुसे म्हणाले. एवढच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. 

याविषयीची चर्चा मंत्री उदय सामंत यांच्यासोबत झाल्याचे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणावर सारवासारव केली असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याशिवाय नुकतेच मुंबईच्या विशेष पोलिस आयुक्तपदी विराजमान झालेल्या देवेन भारती यांची नियुक्ती ही देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचा मुद्दा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला. 

देवेन भारती यांची नियुक्ती देवेंद्र फडणवीस यांनी केली असून याबाबत माझ्याकडे बोट दाखवण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. तसेच या नियुक्तीवरून पोलिस दलात नाराजी व्यक्त करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. दरम्यान, देवेन भारती हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात. 

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये भारती यांना साईड पोस्टींग देण्यात आली होती. पण आता सत्तेत येताच भारती यांची नियुक्ती थेट मुंबईच्या विशेष पोलिस आयुक्तपदी करण्यात आली आहे. त्यामुळेही मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचा गट नाराज असल्याची चर्चा आहे.


कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.