मोबाईल बँकिंगद्वारे ऍक्सिस बॅंक कर्मचाऱ्याचा खातेदारांना 95 लाखांचा गंडा!
मिरज : खरा पंचनामा
मिरजेतील ऍक्सिस बॅंकेत कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने मोबाईल बँकिंगद्वारे खातेदारांना ९५ लाखांचा गंडा घातला आहे. याबाबत फसवणूक केल्याची तक्रार मिरज शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
तोहिद अमीर शरीकमसलत (रा. मिरज) यांच्याविरोधात तक्रार देण्यात आली आहे. संशयित पसार झाला असून खातेदारांसह बँक व्यवस्थापकांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. मिरजेतील ऍक्सिस बँकेत खाते उघडण्याचे काम तोहिद शरीकमसलत करत होता. त्याने ओळखीच्या खातेदारांना म्युच्युअल फंड व बँकेच्या विविध योजनांत पैसे गुंतविण्यास भाग पाडले. काही ओळखीच्या खातेदारांना बँकेने खातेदारांसाठी खास योजना आणली आहे, तुमची एफडी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतो, असेही सांगितले. काही जणांना तर बढतीसाठी बँकेत ठेवी, ठेवण्याची गळ घातली.
खातेदारांकडून त्यांच्या खात्यातील रक्कम मोबाइल बॅकिंगद्धारे इतरांच्या खात्यात वर्ग करून काढून घेतली.
या दरम्यान गणी गोदड या खातेदाराचा बँकेतील मोबाइल क्रमांक बदलून त्यांच्या खात्यातील रक्कम काहीजणांच्या खात्यात वळवून घेतल्याचे निदर्शनास आले. सहा महिन्यांत तोहिद शरीकमसलत याने अशा पद्धतीने वीसहून अधिक जणांची फसवणूक केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यापैकी आठ जणांनी मिरज शहर पोलिसात धाव घेतली आहे. यात अमिना शेख (६ लाख), गणी गोदाड (१२ लाख), हुसेन बेपारी (२३ लाख) शिराज कोतवाल (२३ लाख), वाहिद शरीकमसलत (११ लाख), मेहेबूब मुलाणी (२ लाख), रमेश सेवानी (१६ लाख), अनिल पाटील (२ लाख ) या आठजणांनी मिरज शहर पोलिसात फसवणूकीची तक्रार केली आहे.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तोहिद पसार झाला आहे. वर्ग केलेली रक्कम तोहिद याने सरफराज बेग, ईबाज शरिकमसलत, जहांगीर रोपळे, जिब्रान सय्यद या चारजणांच्या खात्यावर वर्ग करून ती रक्कम रोखीने काढल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबत खातेदारांच्या तक्रारीमुळे ऍक्सिस बँकेचे शाखा व्यवस्थापक साजिद पटेल यांनीही तोहिद शरिकमसलत याच्याविरुद्ध शहर पोलिसात तक्रार दिली आहे.
दरम्यान याप्रकरणी कोणताही गुन्हा अद्याप दाखल झाला नाही. फक्त तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याची शहानिशा करून पुढील कार्यवाही करण्यात येईल असे मिरज शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.