गुंड भावाशा पाटीलला जन्मठेप!
सांगली : खरा पंचनामा
वाळवा तालुक्यातील रेठरेधरण येथील नामचीन गुंड भावशा ऊर्फ भाऊसाहेब वसंतराव पाटील (वय ४४) याला खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी धरण्यात आले आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. गांधी यांनी त्याला जन्मठेप आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम जखमी मोहन पाटील यांच्या वारसांना देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
भावशा पाटीलने दंडाची रक्कम न भरल्यास त्याला आणखी दोन वर्षे साधा कारावास भोगावा लागणार आहे. खुनाच्या प्रयत्नाची ही घटना २७ जानेवारी २००६ रोजी रेठरेधरण बसस्थानक परिसरात घडली होती. याबाबत संभाजी पाटील यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती. सरकार पक्षातर्फे ऍड. रणजित पाटील यांनी काम पाहिले.
भावशा आणि दादासाहेब पाटील-खंडागळे यांच्यामध्ये वैमनस्य होते. जखमी मोहन पाटील त्याच्या शेजारी राहत होते. मात्र, खंडागळे कुटुंबाशी त्यांची मैत्री असल्याने त्यांचे एकमेकांकडे जाणे-येणे होते. मोहन पाटील आपली माहिती खंडागळे कुटुंबाला देतात, असा संशय आणि राग भावाशाला असायचा. याच रागातून त्याने २७ जानेवारी २००६ रोजी मोहन पाटील यांच्यावर कोयत्याने हल्ला केला होता. हल्ल्यानंतर त्याने हातातील रक्ताळलेला कोयता नाचवत दहशत निर्माण केली होती.
याप्रकरणी भावशाविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षाने सात साक्षीदार तपासले. भावशाच्या दहशतीला घाबरून अनेक साक्षीदार फितूर झाले. यातील जखमी मोहन पाटील यांचेही काही वर्षांनी निधन झाले. तपास अधिकारी व्ही. एन. चव्हाण यांचेही निधन झाले. मात्र, फिर्यादी संभाजी पाटील आणि वैद्यकीय अहवालात आरोपीच्या अंगावरील जप्त कपड्यावर जखमी मोहन पाटील यांच्या रक्ताचे नमुने सापडल्याचा निष्कर्ष आल्याने हे पुरावे ग्राह्य धरून न्या. गांधी यांनी भावशाला जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.