Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भाजपने महापौरांना उभे केले आरोपीच्या पिंजऱ्यात!

भाजपने महापौरांना उभे केले आरोपीच्या पिंजऱ्यात! 



सांगली : खरा पंचनामा 

सांगली, कुपवाड आणि मिरज महापालिका क्षेत्रात बसवलेले एलईडी दिवे व भाजी मंडईवरून आज महासभेत गोंधळ झाला. गुलाब कॉलनीतील भाजी मंडई बेकायदेशीर असल्याचा आरोप करीत भाजपने महापौरांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. दोन्ही बाजूच्या सदस्यांच्या घोषणांनी सभागृह दणाणून गेले. शुक्रवारी झालेली महासभा चांगलीच वादळी झाली. यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांच्या विजयाच्या घोषणा दिल्या तर भाजपच्या नगरसेवकांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. 

महापालिकेच्या वसंतदादा पाटील सभागृहात शुक्रवारी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी आयुक्त सुनील पवार उपस्थित होते. सुरुवातीलाच भाजप सदस्यांनी एलईडीवरून फलक घेऊन घोषणाबाजी केली. भाजप नगरसेवकांनी महापौरांसमोर घोषणाबाजी केली. एलईडीच्या कारभाराची चौकशी करावी, कराराची श्वेतपत्रिका काढावी, ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाका, अशी मागणी केली. समुद्रा कंपनीला दिलेली मुदत संपली तरी बऱ्याचशा भागात एलईडी बसले नाहीत. घरफोड्या, चोऱ्यांचे प्रमाण वाढलेत, असे आरोप केले. आयुक्त पवार म्हणाले, ‘जवळपास ३२ हजार दिवे बसवायचे आहेत. किती एनर्जी बचत होते ते तपासावे लागेल. थर्ड पार्टी ऑडिट करण्यात येणार आहे. ठेकेदाराला ५० टक्के बिल दिलेय. जिथे दिवे नाहीत तेथे दिवे लावण्यात येतील. काही ठिकाणी कमी जास्त वॅटचे दिवे लावण्यात आलेत. ते बदलावे लागतील. ठेकेदाराची मुदत डिसेंबरला संपली आहे. ती वाढवून द्यावी लागेल.’ 

समुद्रा कंपनी बरोबरचा करार इंग्रजीत आहे तो मराठीत करून देण्याची मागणी होऊनही ते दिले जात नाही, याबद्दलही सदस्यांनी संताप व्यक्त केला. विजय घाडगे यांनी एलईडी ठेकेदारावर दंडात्मक कारवाईची मागणी केली. विरोधी पक्षनेते संजय मेंढे यांनी धोरणात्मक निर्णयाची माहिती मराठीत का देत नाहीत, असा सवाल करून टेंडर, करारनाम्यांची माहिती सदस्यांना मराठीत द्या, अशी मागणी केली. महापौर सूर्यवंशी यांनी पुढच्या आठवड्यात करार पत्र मराठीत देण्याची सूचना प्रशासनाला केली. समुद्राच्या प्रतिनिधी सोबत नगरसेवकांची बैठक घेऊन माहिती द्यावी, असेही प्रशासनाला आदेश दिले. 

भाजप नगरसेवकांनी गुलाब कॉलनीतील भाजी मंडईचे काम बेकायदेशीर असल्याचा आरोप केला. महापौरांनी कोणताही ठराव न करता, प्रशासनाला माहिती न देता हे बांधकाम करून घेतल्याचा आरोप करत त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. महापौरांनी भाजी मंडईला शासनाकडून निधी आणला आहे. सार्वजनिक बांधकामने आराखडा करून निविदा काढून काम केले. महापालिकेनेही एनओसी दिल्याचे स्पष्ट केले. समाधान न झाल्याने नवलाईंनी आयुक्तांना खुलासा करण्याची मागणी केली. यावरून सभागृहातील वातावरण तंग झाले. काँग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवकांनी महापौरांची बाजू घेत त्यांच्या विजयाच्या तर भाजप नगरसेवकांनी धिक्काराच्या घोषणा दिल्या.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.