म्हैसाळ भ्रूण हत्याकांडाची औरंगाबादमध्ये पुनरावृत्ती
औरंगाबाद : खरा पंचनामा
2017 मध्ये सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथील भ्रूण हत्याकांड प्रकरणाने राज्यात खळबळ उडून दिली होती. आता त्याच प्रकरणाची औरंगाबादमध्ये पुनरावृत्ती पाहायला मिळत आहे.
औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील चितेगाव येथील एका स्त्री रुग्णालयात डॉक्टर पती-पत्नीकडून महिलांचा गर्भपात करण्यात आला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
विशेष म्हणजे एका महिलेचा गर्भपात केल्यानंतर तिची प्रकृती बिघडल्याने तिला शासकीय रुग्णालयात दाखल केल्यावर हा सर्व प्रकार समोर आला आहे. पोलीसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार अमोल जाधव, सोनाली जाधव असे या डॉक्टर पती-पत्नीचं नाव आहे. तर याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल जाधव गेल्या तीन-चार वर्षापासून चितेगाव येथील पांगरा रोडवर औरंगाबाद स्त्री रुग्णालयाच्या नावाने हॉस्पिटल चालवत होता. दरम्यान याच रुग्णालयात तो आणि त्याची पत्नी गर्भपात देखील करायचे. गेल्या तीन वर्षांपासून हा गोरखधंदा सुरू होता. मात्र याची खबर आरोग्य विभागाला लागली नसल्याने आश्चर्य वक्त केले जात आहे. दरम्यान हा सर्व प्रकार उघडकीस आल्याने पुन्हा एकदा म्हैसाळ भ्रूण हत्याकांड प्रकरणाची चर्चा सुरू आहे.
अमोल जाधव आणि त्याच्या पत्नीने आपल्या रुग्णालयात एका महिलेचा 2 जानेवारीला गर्भपात केला होता. दरम्यान कोणताही अनुभव नसतांना आणि शासकीय परवाना नसतानाही त्यांनी गर्भपात केला. ज्यात शस्त्रक्रिया करताना महिलेची प्रकृती बिघडली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. त्यामुळे डॉक्टर अमोल जाधव याने महिलेलेला औरंगाबाद शहरातील एका खाजगी रुग्णालयात नेले. पण प्रकृती गंभीर असल्याने खाजगी रुग्णालयाने देखील उपचार करण्यास नकार दिला. त्यामुळे महिलेलेला एका शासकीय रुग्णालयात दाखल करून डॉक्टर अमोल जाधव फरार झाला. त्यानंतर संबंधित शासकीय रुग्णालयाने याबाबत बिडकीन पोलिसांना माहिती दिल्यावर हा सर्व प्रकार समोर आला आहे.
या घटनेने औरंगाबाद जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तर पोलिस आणि आरोग्य विभागाने रात्री उशिरापर्यंत डॉक्टर अमोल जाधवच्या रुग्णालयात तपासणी करत पंचनामा केला. याप्रकरणी बिडकीन पोलिसात रात्री उशिरा डॉक्टर पती- पत्नी विरोधात गर्भपाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.