बांधावरील झाड तोडल्याने विसापुरात एकाचा खून
सांगली : खरा पंचनामा
शेताच्या बांधावर असलेले सीताफळाचे झाड तोडल्याच्या कारणावरून एकाचा लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून खून करण्यात आला. विसापूर (ता. तासगाव) येथे मंगळवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास मारहाणीची घटना घडली. यामधील जखमीचा तासगाव येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी रात्री मृत्यू झाला. याप्रकरणी एका महिलेसह चौघांवर तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप प्रकाश माळी (वय ३५) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी राजेंद्र धोंडीराम माळी, सुरेखा राजेंद्र माळी, रोहित ऊर्फ संकेत राजेंद्र माळी, राहुल ऊर्फ अमित राजेंद्र माळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मृत संदीप याची पत्नी कोमल संदीप माळी (वय २५) यांनी फिर्याद दिली आहे. संदीप माळी याची विसापूर येथे तीन गुंठे जमीन आहे. या जमिनीच्या बांधावर असलेली सीताफळाची झाडे त्याने तोडली होती.
बांधावरील झाडे तोडल्याचा राग राजेंद्र माळी आणि त्याच्या कुटुंबियांना होता. त्याचा जाब विचारण्यासाठी ते संदीप याच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. काही वेळानंतर हा वाद पुन्हा उफाळून आला. त्यावेळी राजेंद्र माळी याने संदीपचे दोन्ही हात धरले तर सुरेखा यांनी त्याचे दोन्ही पाय धरले. त्यानंतर अन्य दोन संशयितांनी त्याच्या छातीवर बसून त्याला मारहाण केली. तर लाकडी दांडक्याने त्याच्या डोक्यात जबर मारहाण केली. यामध्ये संदीप गंभीर जखमी झाला होता. ही घटना मृत संदीपची पत्नी कोमल हिच्यासमोर घडली.
जखमी संदीपला तातडीने तासगाव येथील खासगी रूग्णालयात दाखल केले. मात्र बुधवारी रात्री त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याप्रकरणी चौघांविरोधात तासगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक भानुदास निंभोरे यांच्यासह पथक हल्लेखोरांचा शोध घेत असल्याचे सांगण्यात आले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.