हळद चोरणाऱ्या दोघा मजूरांना अटक : विश्रामबाग पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
शहरातील विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने मार्केट यार्ड येथून 39 हळद पोती चोरणाऱ्या दोन मजुरांना अटक केली. त्यांच्याकडून चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
ज्ञानेश्वर दिनकर शेंडगे (वय २३, रा. जल शाळेच्या नजीक बामणोली, कुपवाड, सांगली ) आणि समीर शामू जाधव (वय २५ रा. माकडवाले गल्ली, उत्तर शिवाजीनगर, सांगली ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघेही मार्केट यार्डात मजूरीचे काम करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबतची फिर्याद हळद व्यापारी काडाप्पा सदाशिव वारद (रा. नेमिनाथनगर, सांगली ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
काडाप्पा वारद हे शेतकऱ्यांकडून हळकुंड घेवून ते विक्रीकरिता त्यांच्या मालकीच्या गोडावूनमध्ये ठेवतात. सध्या गोडावून मध्ये सुमारे ४०० हळकुंड पोती आहेत. वारद हे दर शनिवारी व सोमवारी किती मालाची विक्री झाली याचा लेखाजोखा घेतात. त्यामध्ये त्यांना दि. २७ ते ३१ मार्च या कालावधीत २२ पोती कमी असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांच्या तपासात सीसीटिव्ही फुटेज तपासण्यात आले असता त्यामध्ये एकजण फिर्यादी वारद यांच्या दुकानातून हळद पोती एका टेम्पोमध्ये भरताना आढळून आला. पोलिसांनी संशयीत ज्ञानेश्वर शेंगडे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार संशयीत समीर जाधव याच्या मदतीने मार्केट यार्डमध्ये असणाऱ्या विविध दुकानांतून ३९ पोती हळद चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांना न्यायालयात हजर केले असता दोघांना 5 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली पोलीस निरिक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक अमितकुमार पाटील, अनिल ऐनापुरे, संदिप घस्ते,आदिनाथ माने, विलास मुंढे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.