बुधगावच्या तरुणाकडून दोन पिस्तूल, काडतुसे जप्त : एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
बुधगाव (ता. मिरज) येथे देशी बनावटीची पिस्तुल घेऊन फिरणाऱ्या तरूणास अटक करण्यात आली. त्याच्याकडून दोन देशी बनावटीची पिस्तूल, 4 काडतुसे, एक दुचाकी असा दीड लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
दीपक जयसिंग रजपूत (वय 37, रा. बुधगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याला बुधवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी घातक शस्त्रे बाळगणारे, ती घेऊन फिरणाऱ्या संशयितांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक शिंदे यांनी गुन्हेगारांना शोधण्यासाठी एक खास पथक तयार केले होते.
दीपक रजपूत त्याच्या कमरेला पिस्तुल लावून दुचाकी (एमएच 10 सीजे 9674) घेऊन बुधगाव येथील स्मशानभूमीजवळ थांबला असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तेथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याजवळ 2 देशी बनावटीची पिस्तुल, 4 काडतुसे सापडली. ती जप्त करून त्याला तात्काळ अटक करण्यात आली.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रशांत निशानदार, सांगली ग्रामीणचे उपनिरीक्षक किरण मगदूम, मेघराज रूपनर, सचिन धोत्रे, कुबेर खोत, संदीप नलवडे, प्रशांत माळी, स्नेहल शिंदे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.